पुणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | अरुणाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला मोठे यश मिळाले आहे. येथील १४ पैकी तीन जागांवर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने हा पहिला मोठा विजय मिळवला आहे. अरुणाचल प्रदेश येथील याचुली, लेकांग आणि बोरदुम्सा-दियुन मतदारसंघातून टोको ताताउंग, लिखा सोनी आणि निख कामिन हे उमेदवार विजयी झाले आहेत. जुलै २०२३ मध्ये राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर पक्षाला मिळालेले हे पहिलेच निवडणूक यश आहे. दरम्यान, आता अजित पवार राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळावा यासाठी प्रयत्न करणार आहेत. निवडणूक आयोगाने अधिकृतरित्या अजित पवार यांच्या गटाला खरा राष्ट्रवादी म्हणून मान्यता दिली.
अरुणाचल प्रदेशमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ३ जागा जिंकल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटून दोन गट पडल्यानंतर अजित पवार यांनी मूळ पक्षावर दावा केला आणि हा पक्ष निवडणूक आयोगाने त्यांच्या ताब्यात दिला. अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतर त्यांच्या पक्षाने मिळवलेले हे पहिलेच राजकीय यश आहे. निवडणुकीच्या निकालामुळे पक्षाला गेल्या वर्षी गमावलेला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा पुन्हा मिळण्याची चिन्हे आहेत. शरद पवार साहेब आमचे राष्ट्रीय अध्यक्ष असताना आम्ही राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गमावला होता, असे श्रीवास्तव यांनी हिंदुस्तान टाइम्सशी बोलताना सांगितले. आता अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक आयोगाकडे हा दर्जा पक्षाला पुन्हा बहाल करण्यात यावा यासाठी दाद मागणार आहोत असे श्रीवास्तव म्हणाले. अविभाजित राष्ट्रवादी काँग्रेसपक्षाने राष्ट्रीय पक्षाच्या पात्रतेचे निकष पूर्ण केले नसल्याच्या कारणावरून निवडणूक आयोगाने ११ एप्रिल रोजी राष्ट्रवादीचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून घेतला होता.