
जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । एसएनडीटी महिला विद्यापीठ आणि डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ कॉम्प्युटर एप्लीकेशन, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय महिला क्रीडा स्पर्धेचा समारोप शुक्रवारी दुपारी उत्साही वातावरणात पार पडला. तीन दिवस चाललेल्या या स्पर्धेत राज्यभरातील विविध महाविद्यालयांतील खेळाडूंनी भाग घेत उत्तम खेळाचे प्रदर्शन सादर केले.
व्हॉलीबॉल आणि ऍथलेटिक्स या प्रमुख क्रीडाप्रकारात सांगलीच्या सी. बी. शाह महाविद्यालयाने प्रथम क्रमांक पटकावला. तायक्वांदो स्पर्धेत विलेपार्ले येथील मणिबेन महाविद्यालयाने बाजी मारली तर रस्सीखेच स्पर्धेत अकलूज येथील एसएनडीटी महाविद्यालय प्रथम क्रमांकावर राहिले. विविध खेळप्रकारांमध्ये उत्कृष्ट, प्रॉमिसिंग व इमर्जिंग खेळाडूंनाही गौरविण्यात आले.
पारितोषिक वितरण समारंभाच्या अध्यक्षस्थानी गोदावरी फाउंडेशनच्या संचालिका डॉ. वर्षा पाटील होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून एसएनडीटी विद्यापीठाचे माजी व्यवस्थापन परिषद सदस्य एस. डी. चौधरी, गोदावरी फाउंडेशनचे संचालक डॉ. वैभव पाटील, जैन इरिगेशनचे निवृत्त अधिकारी संजय चौधरी, क्रीडा संचालिका डॉ. कविता खोलगडे, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. नीलिमा वारके, डॉ. प्रशांत वारके यांची उपस्थिती होती. सुरुवातीला डॉ. प्रशांत वारके यांनी आयोजनाबाबतची प्रस्तावना सादर केली, तर स्पर्धेचा एकंदर आढावा डॉ. कविता खोलगडे यांनी मांडला.
एस. डी. चौधरी यांनी विद्यार्थिनींना अपयशामुळे खचून न जाता सातत्याने यशासाठी प्रयत्न करण्याचे प्रेरणादायी उद्गार काढले. तर डॉ. वर्षा पाटील यांनी खेळामुळे मिळणाऱ्या सकारात्मक ऊर्जेचे महत्त्व पटवून देत, मैदानी खेळ हे केवळ करमणुकीचे नव्हे तर व्यक्तिमत्व विकासाचे माध्यम असल्याचे सांगितले. स्पर्धेतील यशस्वी संघ व खेळाडूंनी आपली मनोगते व्यक्त करत आयोजकांचे आभार मानले. सूत्रसंचालन प्रा. योगिता घोंगडे यांनी तर आभार प्रदर्शन आयोजकांनी केले.
स्पर्धेचा निकाल
व्हॉलीबॉल स्पर्धा : प्रथम – सी. बी. शाह महाविद्यालय, सांगली, द्वितीय : शहा महा., मालाड, तृतीय : उमांगीताई महा., नागपूर. इमर्जिंग खेळाडू : हरिबा शेख, नागपूर, प्रॉमिसिंग खेळाडू : नंदिता पांडे, मालाड, उत्कृष्ट खेळाडू : अक्षदा वाबळे, सांगली. वैयक्तिक उत्तेजनार्थ : देविका पिल्ले, मुंबई व साक्षी माळी, सांगली.
ऍथलेटिक्स : प्रथम – सी. बी. शाह महाविद्यालय, सांगली, द्वितीय : जाधव महा. वज्रेश्वरी, मुंबई, तृतीय : महिला महा., माटुंगा.
तायक्वांदो : प्रथम – मणिबेन कॉलेज, विलेपार्ले, द्वितीय : पी. एन. महा., घाटकोपर, तृतीय : एसएनडीटी महा. चर्चगेट. इमर्जिंग खेळाडू : गौरी कांबळे, चर्चगेट, प्रॉमिसिंग खेळाडू : अनुष्का परदेशी, जुहू, उत्कृष्ट खेळाडू : स्वीटी ढमढेरे, पुणे.
रस्सीखेच : प्रथम – एसआरएनटी महाविद्यालय, अकलूज, द्वितीय : शहा महा., मालाड, तृतीय :सी. बी.शहा महा., सांगली. उत्तेजनार्थ : डॉ. वर्षा पाटील महिला महाविद्यालय, जळगाव.
या स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यासाठी डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ कॉम्प्युटर एप्लीकेशनसह गोदावरी फाउंडेशनच्या विविध अधिकारी, कर्मचारी यांनी मेहनत घेतली. स्पर्धा यशस्वी ठरण्यामध्ये सर्वांचे योगदान मोलाचे ठरले.



