
जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । माजी राष्ट्रपती आणि ‘मिसाईल मॅन’ म्हणून ओळखले जाणारे डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त, वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून रोटरी क्लब ऑफ जळगाव तर्फे एक अनोखा आणि प्रेरणादायी उपक्रम राबविण्यात येत आहे — “रोटरी महावाचन अभियान”. हा उपक्रम वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि जळगावकरांना वाचनाच्या माध्यमातून एकत्र आणण्यासाठी खास आयोजित करण्यात आला आहे.
बुधवार, १५ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ६ या वेळेत गणपती नगरातील रोटरी सभागृहात हे महावाचन अभियान पार पडणार आहे. विशेष म्हणजे या उपक्रमात १५०० हून अधिक नागरिक सहभागी होणार असून प्रत्येकाने किमान १० मिनिटे वाचन करून एकत्रित १५,००० वाचन मिनिटांचा विक्रम करण्याचा संकल्प आयोजकांनी केला आहे.
ही संपूर्ण वाचन चळवळ सर्वसामान्य नागरिक, विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि वाचनप्रेमींसाठी खुली असून पूर्णपणे मोफत आहे. मात्र, सहभागी होण्यासाठी पूर्वनोंदणी आवश्यक असून, इच्छुकांनी https://forms.gle/5P2aRV9Cyfg22umb8 या लिंकवर जाऊन नोंदणी फॉर्म भरावा लागेल.
वाचन करणाऱ्या प्रत्येक सहभागी व्यक्तीस डिजिटल प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार असून, ‘टीडर स्पीक्स’ या माध्यमातून लेखी, ऑडिओ वा व्हिडिओ स्वरूपात त्यांना आपले अभिप्राय देण्याची आणि अनुभव मांडण्याची संधी दिली जाणार आहे.
अभियानाची आणखी एक खासियत म्हणजे ‘रीडर्स वॉल’ — जेथे सहभागी वाचक आपली स्वाक्षरी करू शकतात. तसेच स्मृती स्वरूपात “सेल्फी पॉईंट” उपलब्ध करून देण्यात आला आहे, जिथे सहभागी वाचक आणि कुटुंबीय फोटो घेऊ शकतील. कुटुंबासह सहभागी झालेल्या वाचकांचे ‘वाचक कुटुंब’ म्हणून विशेष फोटो सेशनचे आयोजन करण्यात आले आहे.
वाचन हे अनेक प्रकारे व्यक्तिमत्त्व समृद्ध करत असल्याचे वैज्ञानिक आणि सामाजिक अभ्यासातून सिद्ध झाले आहे. वाचनामुळे कल्पनाशक्ती वाढते, आत्मविश्वास विकसित होतो, भाषाशैलीत सुधारणा होते, ताण कमी होतो आणि संपूर्ण व्यक्तिमत्त्व अधिक घडते. या पार्श्वभूमीवर रोटरी क्लबचा हा महावाचन उपक्रम म्हणजे जळगावकरांसाठी एक सकारात्मक, बौद्धिक आणि प्रेरणादायी पर्वणी ठरणार आहे.
रोटरी क्लबचे अध्यक्ष गिरीश कुलकर्णी, प्रोजेक्ट चेअरमन विजय जोशी आणि को-चेअरमन पंकज व्यवहारे यांनी जळगावकरांना या अभियानात उत्स्फूर्त सहभाग नोंदवण्याचे आवाहन केले आहे. “वाचनाने व्यक्ती घडतो आणि व्यक्तीमधूनच समाज घडतो,” या विचाराने प्रेरित होऊन या उपक्रमास जळगाव शहरातून भरभरून प्रतिसाद मिळेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.



