Home Cities जामनेर पहूरमध्ये अतिक्रमण हटाव मोहिमेवरून संतापाची लाट

पहूरमध्ये अतिक्रमण हटाव मोहिमेवरून संतापाची लाट

0
190


पहूर, ता. जामनेर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । दिवाळीसारख्या सणासुदीच्या दिवसात लोकांचे रोजगार हिरावले गेले तर ते अतिक्रमण हटवले गेले म्हणायचे की माणसांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले, असा संतप्त सवाल पहूर परिसरातील नागरिकांनी केला आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अतिक्रमण हटाव मोहिमेत आज पहूर येथील असंख्य अतिक्रमणधारकांचे टपरे, गाड्या, दुकानांचे स्टॉल्स पाडण्यात आले. परिणामी, या कुटुंबांची दिवाळी अंधारात जाण्याची शक्यता निर्माण झाली असून रोजगाराचे साधनच नाहीसे झाल्याने अनेक कुटुंब रस्त्यावर आले आहेत.

आज दुपारी बारा वाजेपासून पोलीस बंदोबस्तात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी पहूर येथील महामार्गालगतच्या अतिक्रमणांवर कारवाई सुरू केली. यापूर्वी उपविभागीय अभियंता, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, जालना यांनी १५ दिवसांपूर्वी अतिक्रमण काढण्याच्या नोटीसा दिल्या होत्या. मात्र, अतिक्रमणधारकांनी सणासुदीचा कालावधी लक्षात घेऊन कारवाई दिवाळीनंतर करावी, अशी विनंती केली होती. तरीदेखील प्रशासनाने या मागणीची दखल घेतली नाही आणि थेट दिवाळीच्या अवघ्या काही दिवसांआधीच अतिक्रमण हटवण्याची मोहीम हाती घेतली.

या कारवाईत टपऱ्या, फळे-भाज्यांच्या गाड्या, हातगाड्या, चहा-नाश्त्याचे स्टॉल्स, किराणा दुकाने अशा लहान व्यवसाय करणाऱ्या असंख्य कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. संदीप बेढे यांच्यासारख्या टपरीधारकांनी “आमचा गुन्हा काय होता? एवढा मोठा सण काही दिवसांवर असताना, कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचे साधन काढून घेणे माणुसकी आहे का?” असा सवाल उपस्थित केला आहे.

या संपूर्ण कारवाईदरम्यान स्थानिक लोकप्रतिनिधींची अनुपस्थिती देखील नागरीकांच्या संतापाला कारणीभूत ठरली आहे. जामनेर तालुक्याच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावणारे अनेक राजकीय नेते आजच्या कारवाईच्या वेळी पूर्णपणे गैरहजर राहिल्याने अतिक्रमणधारकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. “जेव्हा मत मागायला येतात, तेव्हा आमचं घर झोपडीत असो की रस्त्यावर, सगळ्यांनाच आठवतो. पण आज कोणीच पाठिशी उभा राहिला नाही,” असे अनेक अतिक्रमणधारक सांगत होते.

राजकीय पातळीवर या घटनांचा आगामी ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकांवर निश्चितच परिणाम होण्याची चिन्हे दिसून येत आहेत. लोकप्रतिनिधींनी या प्रकरणात भूमिका घेतली नाही, ही बाब त्यांच्या विरोधात जाण्याची शक्यता आहे.

हिंदू संस्कृतीत अत्यंत पवित्र मानल्या जाणाऱ्या दिवाळीच्या सणाच्या अगदी काही दिवस आधी रोजगाराचे साधन हिरावल्यामुळे अनेक कुटुंबांवर बेरोजगारीची आणि उपासमारीची वेळ आली आहे. यामुळे सामाजिक संवेदनशीलता, प्रशासनाची वेळेची निवड आणि मानवी दृष्टिकोन यावरील प्रश्न उभे राहिले आहेत.


Protected Content

Play sound