भुसावळ प्रतिनिधी । तालुक्यातील दीपनगर प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित मागण्यांची पूर्तता होत नसल्याने प्रकल्पग्रस्तांनी येत्या (दि.२४) रोजी सकाळी १० वाजता प्रकल्पाच्या समोर आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा भुसावळ औष्णिक विद्युत केंद्र प्रकल्पग्रस्त शेतकरी पुर्नवसन समितीच्या वतीने प्रशासनाला देण्यात आला आहे.
समितीच्यावतीने,दि. ९ ऑगस्ट रोजी दीपनगर प्रकल्प प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आले होते. त्यात प्रकल्पाच्या रेल्वे सायडिंग व अन्य कामांसाठी संपदादित करण्यात आलेल्या जमिनींवर प्रकल्पग्रस्तांना नोकरी व प्रशिक्षणात समावून घेण्यासह विविध मागण्यांसाठी प्रकल्पाचे मुख्य अभियंता यांना निवेदन सादर करण्यात आले आहे. त्यात सकारात्मक निर्णय न झाल्यास २४ सप्टेंबर पासून उमेदवारांच्या कुटुंबातील जेष्ठ नागरिक कुटुंबांसह रस्ता रोको आंदोलनात सहाभगी होतील. तसेच आंदोलनाची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील असा ईशारा देण्यात आला आहे. याबाबतच्या निवेदनावर अध्यक्ष प्रभाकर सोनवणे, सचिव सुभाष झांबरे यांच्या स्वाक्षर्या आहेत.