रेल्वेत सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून द्यावे !

 

जळगाव, प्रतिनिधी । रेल्वेने प्रवास करताना एखाद्या महिलेला मासिक पाळी आल्यास तिची कुचंबणा होत असते. महिलांची अडचण दूर करण्यासाठी निधी फाऊंडेशनतर्फे बुधवारी भुसावळ रेल्वे विभागाचे व्यवस्थापक श्री.गुप्ता यांची भेट घेतली. श्री.गुप्ता यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून रेल्वेत सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून देण्याबाबत आश्वासन दिले आहे.

मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाकडून काही रेल्वेमध्ये महिलांसाठी ‘मेरी सहेली’ उपक्रम राबविण्यात येत असल्याचे नुकतेच वाचनात आले. रेल्वेत सुरू असलेल्या या उपक्रमाबद्दल निधी फाऊंडेशनतर्फे अध्यक्षा वैशाली विसपुते, सूर्यकांत विसपुते, चेतन वाणी यांनी अभिनंदन आणि आभार व्यक्त केले. तसेच रेल्वेत महिलांना सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून देण्यासाठी निवेदन दिले.
निधी फाऊंडेशनतर्फे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महिलांच्या सुविधेचा विचार करताना मासिक पाळी आणि सॅनिटरी नॅपकिनचा मुद्दा सर्वप्रथम घेतला जाणे आवश्यक आहे. भारतात रेल्वेचे सर्वात मोठे आणि विस्तारित जाळे आहे. लाखो महिला दररोज रेल्वेने प्रवास करतात. महिलांच्या आयुष्यातील मासिक पाळी ही महत्त्वाची शारीरिक क्रिया आहे. मासिक पाळीची आगामी तारीख अंदाजे असली तरी निश्चित नसते. प्रवासात केव्हाही आणि कुठेही महिलांना मासिक पाळी येऊ शकते. जर असे झाले तर महिलांची मोठी कुचंबना होते आणि अशा वेळी त्यांना प्रवासात सॅनिटरी नॅपकिन वेळीच उपलब्ध होऊ शकत नाही. रेल्वेत महिलांच्या सोयीसाठी टी.सी., सुरक्षा कर्मचारी, महिला सुरक्षा कर्मचारी यांच्याकडे काही प्रमाणात सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून दिल्यास भुसावळ मध्य रेल्वेच्या हा पॅटर्न देशभर वापरला जाऊ शकतो. आपल्या देशात आजही मासिक पाळी विषयावर मोकळेपणाने बोलले जात नाही, विशेषतः ग्रामीण भागात महिलांना समजून घेतले जात नाही. महिलांच्या प्रमुख अडचणीमध्ये मासिक पाळीच्या वेळी सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करणे एक आहे. आपल्या मध्य रेल्वेच्या माध्यमातून रेल्वेत सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून घ्यावे अशी विनंती निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

रेल्वेत सॅनिटरी नॅपकिन उपक्रम देशभर राबविण्यात यावा : वैशाली विसपुते

लॉकडाऊन लागण्यापूर्वी भोपाळच्या एका महिलेचा मध्यरात्री फोन आला. रेल्वेने प्रवास करताना तिला मासिक पाळी आली आणि तिला सॅनिटरी नॅपकिन हवे होते. रेल्वेने प्रवास करणाऱ्या बऱ्याच महिला-मुलींना या अडचणीचा सामना करावा लागत असेल. निधी फाऊंडेशनने यासाठी पुढाकार घेतला असून भुसावळ विभागापासून सुरू झालेला हा उपक्रम देशभर राबविला जाईल असा मला विश्वास असल्याचे निधी फाऊंडेशनच्या अध्यक्षा वैशाली विसपुते यांनी सांगितले.

निधी फाऊंडेशनची कल्पना स्तुत्य : डीआरएम
निधी फाऊंडेशनने सुचवलेली कल्पना स्तुत्य असून भुसावळ रेल्वे विभागात त्याचा कसा उपयोग करता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करू. महिलांच्या अडचणी सोडविण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. रेल्वेच्या टोल फ्री क्रमांक, अँप, वेबसाईटवर कुणीही तक्रार केल्यास किंवा मदत मागितल्यास ती सोडविण्याचा आम्ही प्रयत्न करतो, असे डीआरएम श्री.गुप्ता यांनी सांगितले.

Protected Content