Home Cities जळगाव सैनिकी मुलांच्या वसतिगृहाची प्रवेश प्रक्रिया ३० जूनपासून 

सैनिकी मुलांच्या वसतिगृहाची प्रवेश प्रक्रिया ३० जूनपासून 

0
115


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव येथील सैनिकी मुलांच्या वसतिगृहात शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी प्रवेश प्रक्रिया ३० जून २०२६ पासून सुरू होणार असून आजी-माजी सैनिकांच्या पाल्यांसाठी ही एक महत्त्वाची संधी उपलब्ध झाली आहे. जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने यासंदर्भात माहिती देत पात्र विद्यार्थ्यांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.

जळगाव शहरासह जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये शिक्षण घेणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या मुलांना या वसतिगृहात प्रवेश दिला जाणार आहे. विशेष म्हणजे युद्ध विधवांच्या मुलांना, माजी सैनिक विधवांच्या मुलांना तसेच सैनिकांच्या अनाथ पाल्यांना पूर्णपणे निःशुल्क प्रवेशाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. याशिवाय आजी-माजी सैनिकांच्या इतर पाल्यांना सवलतीच्या दरात प्रवेश दिला जाणार आहे. अतिरिक्त जागा उपलब्ध राहिल्यास इतर नागरिकांच्या मुलांनाही प्रवेशाची संधी मिळणार आहे.

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी वसतिगृहात विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांसाठी दर्जेदार भोजन व निवास व्यवस्था, स्वतंत्र अभ्यासिका, नियमित शारीरिक प्रशिक्षण, सौरऊर्जेच्या माध्यमातून गरम पाण्याची सुविधा, प्रशस्त क्रीडांगण तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि सणांचे आयोजन केले जाते. विद्यार्थ्यांना वेळोवेळी जिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱ्यांकडून करिअर, शिक्षण आणि व्यक्तिमत्त्व विकासाबाबत मार्गदर्शनही दिले जाते. वसतिगृहासाठी निश्चित करण्यात आलेल्या शुल्कानुसार अधिकारी व ऑनररी रँकधारकांच्या पाल्यांसाठी प्रतिमहा ३ हजार रुपये, जेसीओंच्या पाल्यांसाठी २ हजार ८०० रुपये आणि शिपाई व एनसीओंच्या पाल्यांसाठी २ हजार ५०० रुपये शुल्क आकारले जाणार आहे. युद्ध विधवा, माजी सैनिक विधवा आणि सैनिकांच्या अनाथ पाल्यांना मात्र कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. इतर नागरी पाल्यांसाठी भोजन, निवास आणि सेवा करासह प्रतिमहा ३ हजार ५०० रुपये शुल्क निश्चित करण्यात आले आहे.

प्रवेशासाठीचे अर्ज सैनिक कल्याण विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून इच्छुक विद्यार्थ्यांनी संबंधित सैनिकी वसतिगृहात अर्ज सादर करावेत. प्रवेश प्रक्रियेत ‘प्रथम अर्ज, प्रथम प्राधान्य’ या तत्त्वानुसार विद्यार्थ्यांची निवड केली जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने आजी-माजी सैनिकांच्या कुटुंबीयांना या सुविधेची माहिती देत विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी उपलब्ध असलेल्या या निवासी सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी सुरक्षित आणि शिस्तबद्ध वातावरण उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ही योजना राबविण्यात येत आहे.


Protected Content

Play sound