रावेर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । रावेर तालुक्यातील पाल येथील परमपूज्य सद्गुरू संत श्री लक्ष्मण चैतन्य बापूजी वृंदावन धाम आश्रमात २९ जुलै रोजी होणाऱ्या भव्य गुरुपौर्णिमा महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या विविध विभागांची संयुक्त नियोजन बैठक सोमवारी रावेर येथील शासकीय विश्रामगृहात पार पडली. दरवर्षीप्रमाणे यंदाही देशातील विविध राज्यांतून लाखो चैतन्य साधक आणि भाविक या सोहळ्यासाठी येणार असल्याने वाहतूक, सुरक्षा, आरोग्य, वीज, पाणी आणि स्वच्छता यांसह विविध सुविधांचे नियोजन करण्यावर बैठकीत भर देण्यात आला.
संत श्री श्याम चैतन्यजी महाराज यांच्या अध्यक्षतेखाली आणि आमदार अमोल जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या बैठकीत विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी आपापल्या जबाबदाऱ्यांचा आढावा घेतला. गुरुपौर्णिमा सोहळ्यासाठी येणाऱ्या भाविकांना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये यासाठी प्रशासनाने आवश्यक उपाययोजना तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले. बैठकीत रावेर ते पाल-कुसुंबा मार्गावरील रस्त्यांची डागडुजी, सावदा–बोरघाट मार्गे पाल आश्रमात येणाऱ्या पायी दिंड्यांना पोलीस संरक्षण, भाविकांच्या वाहनांच्या वाहतुकीचे नियोजन, तसेच २८ आणि २९ जुलैदरम्यान अतिरिक्त एसटी बससेवा उपलब्ध करून देण्याबाबत चर्चा करण्यात आली. महोत्सव काळात वाहतूक सुरळीत राहण्यासाठी आणि गर्दीचे योग्य नियोजन करण्यासाठी संबंधित विभागांनी समन्वयाने काम करण्याचे ठरविण्यात आले.

कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त ठेवणे, गुरुपौर्णिमेपूर्वी रस्ते, गटारी आणि सार्वजनिक परिसराची स्वच्छता करणे, पिण्याच्या पाण्याची पुरेशी व्यवस्था, गावातील प्रमुख ठिकाणी प्रकाशयोजना, कचरा संकलनासाठी अतिरिक्त कुंड्या उपलब्ध करून देणे तसेच महावितरणमार्फत अखंडित वीजपुरवठा सुनिश्चित करण्यावरही बैठकीत विशेष भर देण्यात आला. आरोग्य विभागाच्या वतीने आश्रम परिसरात तात्पुरते वैद्यकीय शिबिर उभारून भाविकांची तपासणी व उपचार सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. तसेच अग्निशमन दल, वन विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, एसटी महामंडळ आणि अन्य संबंधित यंत्रणांनी आपापल्या जबाबदाऱ्या वेळेत पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.
बैठकीला तहसीलदार दीपाली जेथे, गटविकास अधिकारी मेढे, पोलीस निरीक्षक संदीप पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे ब्रह्मानंद तायडे, महावितरणचे उपकार्यकारी अभियंता नितीन सूर्यवंशी, एसटी महामंडळाचे तडवी, आरोग्य विभाग, वन विभागाचे अधिकारी तसेच ओ. के. पवार, स्वामी परिवाराचे रवींद्र पवार आणि इतर मान्यवर उपस्थित होते. अध्यक्षीय समारोप करताना संत श्री श्याम चैतन्यजी महाराज यांनी गुरू-शिष्य परंपरेचे महत्त्व अधोरेखित केले. निस्वार्थ सेवाच ही खरी भक्ती असून, गुरुपौर्णिमा महोत्सवात प्रत्येकाने सेवाभावाने सहभागी होऊन आपले कर्तव्य पार पाडावे, असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.



