यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शैक्षणिक, क्रीडा आणि सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल श्री समर्थ रघुनाथ बाबा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे सेवानिवृत्त क्रीडा शिक्षक तथा सामाजिक कार्यकर्ते युवराज यशवंत पाटील यांना ‘राजपूत समाज भूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या वतीने आयोजित विशेष समारंभात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला असून, त्यांच्या कार्याचा विविध स्तरांतून गौरव करण्यात आला आहे.
राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेवसिंह गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त १२ जुलै रोजी आयोजित कार्यक्रमात हा सन्मान सोहळा पार पडला. विलास पाटील, दामोदर राजपूत, डॉ. विश्वजित सिसोदिया, विठ्ठलसिंग मोरे तसेच कार्यक्रमाचे आयोजक प्रवीणसिंह पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत युवराज पाटील यांना पुरस्कार, सन्मानचिन्ह आणि गौरवपत्र प्रदान करण्यात आले. कै. यशवंत सुपडू पाटील यांचे ज्येष्ठ चिरंजीव असलेले युवराज पाटील यांनी आपल्या शिक्षक कारकिर्दीत विद्यार्थ्यांमध्ये क्रीडाप्रेम, शिस्त आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाची जपणूक करण्यासाठी विशेष योगदान दिले. क्रीडा शिक्षक म्हणून कार्यरत असताना त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना विविध स्पर्धांसाठी घडविण्याचे काम केले. त्याचबरोबर सामाजिक क्षेत्रातही त्यांनी सातत्याने सक्रिय सहभाग नोंदवत विविध उपक्रमांमध्ये योगदान दिले आहे.

यापूर्वीही त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना जिल्हास्तरीय आदर्श क्रीडा पुरस्काराने गौरविण्यात आले होते. शिक्षण आणि समाजकार्यातील सातत्यपूर्ण योगदानामुळे त्यांना मिळालेला ‘राजपूत समाज भूषण’ पुरस्कार हा त्यांच्या कार्याचा आणखी एक महत्त्वपूर्ण सन्मान मानला जात आहे. या गौरवानंतर श्री समर्थ रघुनाथ बाबा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, चुंचाळे संस्थेचे अध्यक्ष सुरेश चौधरी, उपाध्यक्ष, सचिव ज. रा. कोळी, प्राचार्य डी. बी. मोरे, संचालक मंडळातील सदस्य तसेच शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी युवराज पाटील यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
याशिवाय माजी ग्रामपंचायत सदस्य विठ्ठल राजपूत, बोराळे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती उजैनसिंग राजपूत, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष धनसिंग राजपूत, अजय जाधव, गणेश पाटील, राजू सोनवणे, सुकलाल राजपूत, रमेश राजपूत, मानसिंग राजपूत, अरुण राजपूत, उपसरपंच संजय राजपूत, मुबारक तडवी, दीपक कोळी, सुधाकर कोळी, मनोज धनगर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करत त्यांच्या सामाजिक आणि शैक्षणिक कार्याचे कौतुक केले.



