सेवानिवृत्त अधिकाऱ्याची ३१ लाख ५० हजारांची ऑनलाईन फसवणूक !


जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । दिल्ली सीबीआय पोलीस असल्याचे भासवून ‘सुनील कुमार’ नावाच्या एका व्यक्तीने चाळीसगाव तालुक्यातील एका ७३ वर्षीय सेवानिवृत्त वैद्यकीय अधिकाऱ्याची तब्बल ३१ लाख ५० हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी मंगळवार, २४ जून रोजी रात्री ८ वाजता जळगाव येथील सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चाळीसगाव तालुक्यातील हे सेवानिवृत्त वैद्यकीय अधिकारी यांच्याशी १६ जून ते २३ जून २०२५ या कालावधीत ‘सुनील कुमार’ नावाच्या व्यक्तीने संपर्क साधला. आपण दिल्ली सीबीआय पोलीस स्टेशनमधून बोलत असल्याचे सांगून, त्या व्यक्तीने सेवानिवृत्त अधिकाऱ्याचे बँक खाते मनी लॉन्ड्रिंगसाठी वापरले जात असल्याची बतावणी केली. मोठ्या कौशल्याने त्याने वृद्ध अधिकाऱ्याचा विश्वास संपादन केला.

यानंतर, विविध कारणांसाठी त्याने वेळोवेळी ऑनलाइन पद्धतीने तब्बल ३१ लाख ५० हजार रुपये आपल्या खात्यात जमा करून घेतले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर, या सेवानिवृत्त वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तात्काळ जळगाव येथील सायबर पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि फिर्याद दिली. त्यानुसार, मंगळवारी २४ जून रोजी रात्री ८ वाजता ‘सुनील कुमार’ नावाच्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सतीश गोराडे करत आहेत.