जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । सध्या जळगाव जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये, विशेषतः रावेर मतदारसंघात, शेतकऱ्यांना युरिया आणि डीएपी (DAP) या अत्यावश्यक खतांचा तीव्र तुटवडा जाणवत आहे. खत खरेदीसाठी असलेल्या लिंकिंग प्रणालीच्या अंमलबजावणीमुळे अनेक शेतकऱ्यांना वेळेवर खत मिळत नाहीये, ज्यामुळे खरीप हंगामातील पेरण्यांवर आणि पिकांवर प्रतिकूल परिणाम होण्याची भीती निर्माण झाली आहे.
या गंभीर परिस्थितीची दखल घेत रावेरचे आमदार अमोलभाऊ जावळे यांनी तातडीने महाराष्ट्राचे कृषी मंत्री ना. माणिकरावजी कोकाटे आणि जिल्हाधिकारी जळगाव यांना निवेदन दिले आहे. या निवेदनात त्यांनी लिंकिंग प्रणालीशिवाय (Non-Linking) युरिया आणि डीएपी खत तातडीने शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देण्याची आग्रही मागणी केली आहे.
शेतकऱ्यांना वेळेत आणि पुरेशा प्रमाणात खत मिळावे यासाठी जिल्हा प्रशासनाने तत्काळ पावले उचलावीत आणि खत वितरणात अधिक लवचिकता ठेवावी, अशी भूमिका आमदार जावळे यांनी मांडली आहे. खतांच्या तुटवड्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता असल्याने, शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.