राजर्षी शाहू जयंतीनिमित्त जळगावात ‘जात वैधता’ प्रमाणपत्र मोहीमेचे आयोजन


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून, जळगाव जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने २६ जून ते ४ जुलै २०२५ या कालावधीत ‘जयंती पर्व’ साजरे करण्याचे ठरवले आहे. या निमित्ताने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र तात्काळ मिळवून देण्यासाठी एक विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.

या उपक्रमांतर्गत शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी सीईटी परीक्षा देणारे तसेच डिप्लोमाच्या तृतीय वर्षात प्रवेश घेणारे विद्यार्थी आपले अर्ज सादर करून जात पडताळणी प्रक्रियेत सहभागी होऊ शकणार आहेत. यामध्ये विज्ञान शाखेतील अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास वर्ग (इमाव) आणि विशेष मागास वर्ग यांसारख्या सर्व प्रवर्गांतील विद्यार्थ्यांची माहिती तालुका आणि महाविद्यालयनिहाय संकलित केली जाईल.

विद्यार्थ्यांना अर्ज भरताना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी, संबंधित महाविद्यालयांमधील समान संधी केंद्रांमार्फत विशेष वेबिनारचे आयोजन करण्यात येणार आहे. या वेबिनारद्वारे विद्यार्थ्यांना अर्ज प्रक्रिया आणि आवश्यक कागदपत्रांबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले जाईल.

जिल्हा जात पडताळणी समितीने सर्व अर्ज प्राप्त झाल्यानंतर त्यावर तातडीने कार्यवाही करून विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र देण्याचे नियोजन केले आहे. यासाठी २६ व २७ जून, तसेच २ व ३ जुलै २०२५ या तारखांना त्रुटी पूर्तता मोहीम आयोजित करण्यात आली आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांच्या अर्जांमधील त्रुटी दूर करून प्रक्रिया जलद पूर्ण करता येईल.

या विशेष मोहिमेचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातील सर्व पात्र विद्यार्थ्यांनी आपापल्या महाविद्यालयात आपले परिपूर्ण अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा जात पडताळणी समितीच्या संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव श्रीमती एन. एस. रायते यांनी केले आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना वेळेत जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यास मोठी मदत होणार आहे.