जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून जळगावात ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ या भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, यामधून राज्याच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचा प्रभावी आविष्कार साकारला जाणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग व सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
राज्याच्या लोकपरंपरा, विविध कलाप्रकार आणि सांस्कृतिक वारशाचे जतन व संवर्धन करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. नागरिकांमध्ये सांस्कृतिक अभिमान जागृत करणे हा या कार्यक्रमाचा प्रमुख हेतू आहे.

कार्यक्रमात ‘लोकयात्रा कलामंच’ यांचे विशेष सादरीकरण होणार असून, लोककला, पारंपरिक नृत्य आणि विविध कलाप्रकारांच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचे दर्शन घडणार आहे. या सादरीकरणातून प्रेक्षकांना एक वेधक आणि समृद्ध सांस्कृतिक अनुभव मिळणार आहे.
हा कार्यक्रम शुक्रवार, दि. १ मे २०२६ रोजी सायंकाळी ६:३० वाजता कान्ह ललित कला केंद्र, नाट्य सभागृह, एम. जे. कॉलेज परिसर, एकलव्य क्रीडा संकुल, जळगाव येथे आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाचा शुभारंभ पालकमंत्री नामदार गुलाबराव पाटील यांच्या हस्ते होणार असून, खासदार स्मिता वाघ, आमदार राजूमामा भोळे, महापौर दिपमाला काळे, जिल्हाधिकारी रोहण घुगे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी करिष्मा नायर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
सदर कार्यक्रमाची संकल्पना मंत्री अॅड. आशिष शेलार यांची असून, सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली तो आयोजित करण्यात येत आहे. सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या वतीने या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे.
हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुला असून, जळगाव शहर व परिसरातील नागरिक, विद्यार्थी आणि सांस्कृतिक रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सांस्कृतिक सोहळ्याचा आनंद घ्यावा, असे आवाहन संचालक बिभीषण चवरे यांनी केले आहे.



