जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील रेल्वे स्थानकाजवळील गार्डनमध्ये पिण्याचे पाणी देणाऱ्या एका तरुणाला, ‘तू माझी मजाक उडवतोस’ असा संशय आल्याने तरूणाला लाकडी काठीने बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सागर महारु सपकाळे (वय ३०, रा. रामेश्वर कॉलनी, जळगाव) हे मजुरीचे काम करतात. २९ एप्रिल रोजी दुपारी २:३० ते ३:०० वाजेच्या सुमारास ते रेल्वे स्टेशनजवळील गार्डनमध्ये सार्वजनिक ठिकाणी होते. यावेळी सागर सपकाळे याने संशयित आरोपी प्रकाश घमा कुंभार (रा. भादली, ता. जि. जळगाव) याला पिण्याचे पाणी दिले.

मात्र, पाणी दिल्यानंतर थट्टी व मस्करी केल्याचा संशय आल्याने संशयित आरोपी प्रकाश कुंभार याने सागर सपकाळे यांना अश्लील शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. वादाचे रूपांतर हाणामारीत होऊन आरोपीने जवळच पडलेली लाकडी काठी उचलून फिर्यादीला मारहाण केली. या हल्ल्यात सागर यांच्या उजव्या हाताला आणि पाठीला गंभीर दुखापत झाली आहे. याप्रकरणी जळगाव शहर पोलनीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोहेकॉ महेंद्र गायकवाड हे करीत आहे.



