
जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । बकरा ईदच्या पूर्वसंध्येला जळगाव शहरात सामाजिक ऐक्य, पर्यावरण संरक्षण आणि भारतीय संस्कृतीच्या जतनाचा संदेश देणारे आगळेवेगळे आंदोलन पाहायला मिळाले. एकता संघटनेच्या वतीने शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आक्रमक पण पूर्णतः शांततापूर्ण निदर्शने करण्यात आली. “गायला राष्ट्रीय प्राणी घोषित करा” अशी ठळक मागणी करणारे फलक हातात घेऊन कार्यकर्त्यांनी चौकात उभे राहत शासनाचे आणि जळगावकरांचे लक्ष वेधून घेतले. विशेष म्हणजे या आंदोलनाला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि चौकात काही काळ चर्चेचे वातावरण निर्माण झाले.

शहरातील मध्यवर्ती छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकता संघटनेच्या कार्यकर्त्यांनी विविध दिशांनी उभे राहत शांततेच्या मार्गाने आपली भूमिका मांडली. कोणतीही आक्रमक भाषा किंवा चिथावणीखोर घोषणांचा वापर न करता संविधानिक पद्धतीने आंदोलन करण्यात आले. चौकातून जाणारे वाहनधारक, सिग्नलवर थांबलेले नागरिक, व्यापारी आणि स्थानिक रहिवाशांनी या आंदोलनाकडे उत्सुकतेने पाहत आपापल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. अनेकांनी वाहन थांबवून कार्यकर्त्यांचे अभिनंदन करत पाठिंबा दर्शविला. “खरे समाजकार्य म्हणजे समाजात सकारात्मक विचार मांडणे”, “धर्माच्या नावावर मतभेद नव्हे, तर संस्कृती आणि पर्यावरण रक्षणासाठी एकत्र आवाज उठवणे आवश्यक आहे,” अशा प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त करण्यात आल्या.
एकता संघटनेचे समन्वयक फारुक शेख यांनी आंदोलनामागची भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, हा उपक्रम कोणत्याही धर्म किंवा समाजाच्या विरोधात नसून भारतीय संस्कृती, शेती व्यवस्था, पर्यावरण संतुलन आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या संरक्षणासाठी आहे. गाय ही भारतीय जीवनपद्धतीचा महत्त्वाचा भाग असून ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था, दुग्ध व्यवसाय आणि शेती व्यवस्थेशी तिचे थेट नाते आहे. त्यामुळे गायीचे संरक्षण ही काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. समाजात एकतेचा संदेश देत सांस्कृतिक मूल्यांचे जतन करण्यासाठी अशा प्रकारचे शांततापूर्ण आंदोलन महत्त्वाचे असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी समन्वयक फारुक शेख यांनी शासनालाही थेट प्रश्न उपस्थित केला. “देशात वाघाला राष्ट्रीय प्राणी म्हणून मान्यता मिळू शकते, तर भारतीय शेती, दुग्ध व्यवसाय, पर्यावरण आणि ग्रामीण जीवनाशी थेट नाळ जोडलेल्या गायीला राष्ट्रीय प्राणी घोषित करण्यात सरकारला अडचण काय आहे? गायीच्या नावावर केवळ राजकारण करणाऱ्यांनी आता प्रत्यक्षात कायदेशीर पावले उचलून दाखवावी,” अशी भूमिका त्यांनी मांडली. त्यांच्या या वक्तव्यामुळे चौकातील वातावरण अधिक लक्षवेधी बनले.
निदर्शनादरम्यान मतीन पटेल आणि चीनावलचे नजीर शेख यांनी “गाय वाचवा – संस्कृती वाचवा”, “एकता, संस्कृती आणि पर्यावरणासाठी गाय संरक्षण आवश्यक” तसेच “देशाच्या संस्कृतीचा सन्मान करा – गायला राष्ट्रीय प्राणी घोषित करा” अशा घोषणा देत आंदोलनात जोश निर्माण केला. मात्र संपूर्ण आंदोलनादरम्यान शांतता, संयम आणि सामाजिक सलोखा कायम ठेवण्यात आला. आंदोलनकर्त्यांनी केंद्र आणि राज्य शासनाला निवेदन देऊन गायीला राष्ट्रीय प्राणी घोषित करण्यासाठी तातडीने कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्याची मागणी केली. “फक्त भावना भडकवून राजकारण करण्यापेक्षा प्रत्यक्ष कायदेशीर निर्णय घेण्याची वेळ आली आहे,” असा इशाराही एकता संघटनेच्या वतीने हाफिज रहीम पटेल यांनी दिला.
या आंदोलनाचा समारोप हाफिज रहीम पटेल यांच्या सामूहिक दुवाने करण्यात आला. यावेळी फारुक शेख, मतीन पटेल, हाफिज रहीम पटेल, अँड अवेश शेख, मौलाना गुफरान, अन्वर शिकलगार, नजमोद्दीन शेख, मेहमूद रंगरेज, वसीम चांद, मतीन शेख, शिरपूरचे भिकन शेख तसेच चीनावलचे नजीर शेख आणि हुझेफा शेख यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.



