Home Cities जळगाव रेल्वे भरतीतील पात्र उमेदवारांचे आमरण उपोषण तीव्र ; आंदोलनकर्त्याची प्रकृती खालावली 

रेल्वे भरतीतील पात्र उमेदवारांचे आमरण उपोषण तीव्र ; आंदोलनकर्त्याची प्रकृती खालावली 


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । रेल्वे विभागाच्या २००७ मधील चतुर्थश्रेणी भरती प्रक्रियेत सर्व टप्पे पूर्ण करून मेडिकल पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या नियुक्तीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. गेल्या तीन दिवसांपासून जळगावात सुरू असलेल्या बेमुदत आमरण उपोषणाने बुधवारी अधिक तीव्र स्वरूप धारण केले. आंदोलनाच्या तिसऱ्याच दिवशी उपोषणकर्ते अविनाश मनवर यांची प्रकृती अचानक खालावल्याने आंदोलनस्थळी मोठी खळबळ उडाली. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले. या घटनेनंतर संतप्त झालेल्या उमेदवारांनी मुंडन करून केंद्र सरकार, राज्य सरकार आणि रेल्वे प्रशासनाविरोधात जोरदार निषेध नोंदवला.

रेल्वेच्या २००७ मधील भरती प्रक्रियेत अनेक उमेदवारांनी लेखी परीक्षा, शारीरिक चाचणी आणि वैद्यकीय तपासणी पूर्ण केली होती. मात्र तब्बल १९ वर्षांनंतरही नियुक्ती न मिळाल्याने उमेदवारांमध्ये तीव्र नाराजी आहे. गेल्या काही दिवसांपासून जळगावात उमेदवारांनी आमरण उपोषण सुरू केले असून न्याय मिळावा आणि नियुक्ती प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, अशी त्यांची मुख्य मागणी आहे. उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी प्रकृती बिघडल्याच्या घटनेने आंदोलन अधिक चिघळले.

अविनाश मनवर यांची प्रकृती बिघडल्यानंतर आंदोलनकर्त्यांनी सरकार आणि रेल्वे प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेतली. निषेध म्हणून अनेक उमेदवारांनी सामूहिक मुंडन केले. आंदोलनस्थळी घोषणाबाजी करत उमेदवारांनी प्रशासनाविरोधात तीव्र भावना व्यक्त केल्या. यानंतर आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची भेट घेऊन आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले. उमेदवारांच्या भावना आणि प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी तत्काळ हस्तक्षेप केला.

जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी रेल्वेच्या जनरल मॅनेजर यांच्याशी थेट दूरध्वनीवर संपर्क साधत प्रकरणाची माहिती दिली. “आंदोलनकर्ते उमेदवार माझ्या कार्यालयात आले आहेत. या विषयावर तातडीने योग्य ती कारवाई व्हावी,” अशी स्पष्ट भूमिका जिल्हाधिकाऱ्यांनी मांडली. मात्र त्यावर जनरल मॅनेजर यांनी या विषयाची माहिती नसल्याचे सांगितल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात आले. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी १९ मे रोजी याच विषयासंदर्भात अधिकृत पत्र पाठविल्याची आठवण करून देत तातडीने पाठपुरावा करण्याची मागणी केली.

जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपानंतरही रेल्वे प्रशासनाकडून ठोस निर्णय न झाल्याने आंदोलनकर्त्यांचा संताप आणखी वाढला आहे. पत्रकारांशी बोलताना आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट शब्दांत भूमिका मांडली. “जिल्हाधिकाऱ्यांनी आमची दखल घेतली, आमची बाजू ऐकून घेतली. पण रेल्वे प्रशासन अजूनही उडवाउडवीची उत्तरे देत आहे. आम्हाला न्याय मिळेपर्यंत हे आंदोलन मागे घेणार नाही. आता जीव गेला तरी बेहत्तर, पण नियुक्ती मिळाल्याशिवाय उठणार नाही,” अशी भूमिका त्यांनी मांडली.


Protected Content

Play sound