Home Cities जळगाव MAHATET परीक्षेच्या पार्श्वभूमीवर जळगाव शहरात प्रतिबंधात्मक आदेश लागू

MAHATET परीक्षेच्या पार्श्वभूमीवर जळगाव शहरात प्रतिबंधात्मक आदेश लागू

0
28


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) सुरळीत आणि कॉपीमुक्त वातावरणात पार पडावी यासाठी जळगाव शहरात प्रशासनाकडून प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. दि. २८ जून २०२६ रोजी होणाऱ्या या परीक्षेदरम्यान गैरप्रकार रोखण्यासाठी तसेच परीक्षा केंद्रांवर शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनाने विशेष उपाययोजना केल्या आहेत.

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) रविवार, दि. २८ जून २०२६ रोजी जळगाव शहरातील ३० परीक्षा केंद्रांवर घेण्यात येणार आहे. ही परीक्षा सकाळी ८.०० ते सायंकाळी ५.०० या कालावधीत होणार असून, परीक्षेच्या पार्श्वभूमीवर परीक्षा केंद्र परिसरात मोठ्या प्रमाणावर गर्दी होण्याची शक्यता आहे. परीक्षेदरम्यान कॉपीचे प्रकार, गैरप्रकार किंवा अनुचित घटना घडू नयेत तसेच “कॉपीमुक्त अभियान” प्रभावीपणे राबविण्यासाठी अपर जिल्हादंडाधिकारी, जळगाव यांनी भारतीय नागरी सुरक्षा संहिता, २०२३ मधील कलम १६३ अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.

या आदेशानुसार, दि. २८ जून २०२६ रोजी परीक्षा सुरू झाल्यापासून ते परीक्षा समाप्त होईपर्यंत म्हणजेच सकाळी ८.०० ते सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत जळगाव शहरातील सर्व परीक्षा केंद्रांच्या १०० मीटर परिसरात अनधिकृत व्यक्तींना प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे. मात्र, हा आदेश परीक्षार्थी, परीक्षा केंद्रांवर नियुक्त अधिकारी व कर्मचारी, पोलीस अधिकारी व कर्मचारी तसेच होमगार्ड यांना लागू राहणार नाही. परीक्षा प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी संबंधित अधिकृत व्यक्तींना आवश्यक ते सहकार्य करण्यात येणार आहे.

याशिवाय, सर्व परीक्षा केंद्रांच्या ५०० मीटर परिसरातील झेरॉक्स दुकाने परीक्षा कालावधीत बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. परीक्षेदरम्यान प्रश्नपत्रिका किंवा उत्तरपत्रिकांशी संबंधित कोणताही गैरप्रकार होऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. सदर आदेश संबंधित व्यक्तींना वैयक्तिक स्वरूपात नोटीस बजावण्यासाठी पुरेसा कालावधी उपलब्ध नसल्याने भारतीय नागरी सुरक्षा संहिता, २०२३ च्या कलम १६३ नुसार एकतर्फी स्वरूपात जारी करण्यात आल्याचे अपर जिल्हादंडाधिकारी वैशाली चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे.


Protected Content

Play sound