


यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । मोहरम सणाच्या पार्श्वभूमीवर यावल शहरात २६ जून २०२६ रोजी भरणारा नियमित आठवडे बाजार बंद ठेवण्याचा आदेश जिल्हा प्रशासनाकडून जारी करण्यात आला आहे. सणानिमित्त होणारी मोठी गर्दी, वाहतूक कोंडी आणि कायदा-सुव्यवस्थेच्या संभाव्य अडचणी लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.
मुस्लिम बांधवांचा पवित्र मोहरम सण दि. २६ जून २०२६ रोजी साजरा केला जाणार असून यावल शहरात धार्मिक कार्यक्रमांसाठी मोठ्या प्रमाणावर नागरिक सहभागी होण्याची शक्यता आहे. त्याच दिवशी शहरात नियमित आठवडे बाजारही भरत असल्याने दोन्ही कारणांमुळे गर्दी वाढून सार्वजनिक व्यवस्था विस्कळीत होण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे. ही बाब लक्षात घेऊन जिल्हादंडाधिकारी रोहन घुगे यांनी मुंबई मार्केट अॅण्ड फेअर्स अधिनियम, १८६२ मधील कलम ५ (अ) व (क) अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून हा आदेश जारी केला आहे. आदेशानुसार २६ जून रोजी यावल शहरात भरणारा आठवडे बाजार पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, सणाच्या पार्श्वभूमीवर होणारी संभाव्य गर्दी आणि बाजारातील व्यापारी व ग्राहकांची मोठी वर्दळ लक्षात घेता वाहतूक व्यवस्थेवर ताण येऊ शकतो. तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.



