Home अर्थ डाक जीवन विमा आणि ग्रामीण टपाल जीवन विम्यासाठी विमा प्रतिनिधी भरती ;...

डाक जीवन विमा आणि ग्रामीण टपाल जीवन विम्यासाठी विमा प्रतिनिधी भरती ; भुसावळ येथे २ जुलै रोजी थेट मुलाखत

0
10


भुसावळ-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । भारतीय डाक विभागामार्फत डाक जीवन विमा (PLI) तसेच ग्रामीण टपाल जीवन विमा (RPLI) योजनांच्या विक्रीसाठी विमा प्रतिनिधींची नियुक्ती करण्यात येणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी भुसावळ येथे दि. २ जुलै २०२६ रोजी थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

अधीक्षक डाकघर, भुसावळ विभाग यांच्या कार्यालयामार्फत ही निवड प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. विमा प्रतिनिधी म्हणून काम करण्याची संधी मिळविण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसह थेट मुलाखतीसाठी उपस्थित राहावे, असे आवाहन डाक विभागाकडून करण्यात आले आहे.या भरतीसाठी उमेदवारांनी अर्जासोबत आधार कार्ड, पॅन कार्ड, जन्मतारखेचा पुरावा, शैक्षणिक प्रमाणपत्रे, पासपोर्ट आकाराचा फोटो तसेच इतर आवश्यक कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. उमेदवारांनी दि. २ जुलै २०२६ रोजी सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत अधीक्षक डाकघर, भुसावळ विभाग, भुसावळ येथे प्रत्यक्ष उपस्थित राहावे.

विमा प्रतिनिधी पदासाठी उमेदवाराचे वय किमान १८ वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे. शैक्षणिक पात्रता म्हणून किमान दहावी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. याशिवाय विमा पॉलिसी विक्रीचा अनुभव, प्रभावी मार्केटिंग कौशल्य आणि स्थानिक भागाची माहिती असलेल्या उमेदवारांना निवड प्रक्रियेत प्राधान्य दिले जाणार आहे. या संधीसाठी बेरोजगार युवक-युवती, स्वयंरोजगार करणारे पुरुष व महिला, माजी विमा प्रतिनिधी, विमा सल्लागार, अंगणवाडी सेविका, बचत गटातील महिला, माजी सैनिक, ग्रामपंचायत सदस्य तसेच स्वयंसेवी संस्था चालक अर्ज करू शकतात.

डाक जीवन विमा आणि ग्रामीण टपाल जीवन विमा योजनांच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत विमा सुविधा पोहोचविण्याचे काम विमा प्रतिनिधींना करावे लागणार आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर संपर्क क्षमता आणि जनसंपर्क कौशल्य असलेल्या व्यक्तींना या संधीचा लाभ घेता येणार आहे. विमा प्रतिनिधींच्या निवडीबाबत तसेच थेट मुलाखतीसंदर्भातील सर्व अधिकार अधीक्षक डाकघर, भुसावळ विभाग यांच्याकडे राखीव ठेवण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी इच्छुकांनी जवळच्या पोस्ट कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन डाक विभागाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.


Protected Content

Play sound