नवी दिल्ली (वृत्तसंस्था) भारतीय रिझर्व्ह बँक अर्थात आरबीआयचे डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्य यांनी त्यांच्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. विरल आचार्य यांनी त्यांचा निर्धारित कार्यकाळ पूर्ण होण्याच्या सहा महिने आधीच आपले पद सोडले आहे. दरम्यान, आरबीआयमध्ये केंद्र सरकारच्या वाढत्या हस्तक्षेपाच्या कारणामुळेच आचार्य यांनी राजीनामा दिला असल्याची चर्चा आहे.
विरल आचार्य यांची रिझर्व्ह बँकेच्या डेप्युटी गव्हर्नरपदी तीन वर्षांसाठी नियुक्ती करण्यात आली होती. २३ जानेवारी २०१७ ला त्यांनी पदभार स्वीकारला होता. मात्र आपला कार्यकाळ पूर्ण होण्याच्या सहा महिने आधीच त्यांनी पद सोडले आहे. डिसेंबरमध्ये उर्जित पटेल यांनी वैयक्तिक कारण देत गव्हर्नर पदाचा राजीनामा दिला होता. विरल आचार्य हे उर्जित पटेल यांच्या टीमचे महत्त्वाचे घटक होते. मात्र त्यांनीही पटेल यांच्या प्रमाणेच कार्यकाळ संपण्याआधी राजीनामा दिला. 23 जानेवारी 2017 रोजी आचार्य आरबीआयच्या सेवेत रुजू झाले. त्यांचा कार्यकाळ तीन वर्षांचा होता. पटेल यांच्या राजीनाम्यानंतर सरकारनं शक्तिकांत दास यांची गव्हर्नरपदी नियुक्ती केली. मात्र दास आणि विरल यांच्या मतांमध्ये बरेच अंतर होते. पतधोरण निश्चित करण्यासाठी झालेल्या मागील दोन बैठकांमध्ये महागाई आणि विकास दर या मुद्द्यांवरुन दोघांचे मतभेद समोर आले होते. नुकत्याच झालेल्या पतधोरण समितीच्या बैठकीत वाढत्या महसुली तुटीवरुन आचार्य यांनी मांडलेली मतं दास यांच्यापेक्षा वेगळी होती. तसेच केंद्र सरकारचा आरबीआयच्या कार्यप्रणालीतील वाढता हस्तक्षेप आचार्य यांना खटकत होता.