भोपाळ (वृत्तसंस्था) मुसळधार पावसामुळे महाराष्ट्रासह मध्यप्रदेश, गुजरात आणि राजस्थानसह देशभरात आतापर्यंत 35 जणांचा मृत्यू झाला. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी फक्त गुजरातमधील पीडितांना मदत करण्याची घोषणा केली. त्यामुळे संतप्त झालेल्या मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी ट्विटरद्वारे मोदीजी तुम्ही केवळ गुजरातचे नाही तर संपूर्ण देशाचे पंतप्रधान आहात,अशा शब्दात टीका केली आहे.
देशभरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे 35 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. त्यामुळे शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झाले आहे. याबाबत पंतप्रधान कार्यालयाने ट्वीट करुन म्हटले होते की, गुजरातमध्ये मुसळधार पाऊस आणि वादळामुळे जीव गमवावा लागलेल्या लोकांच्या कुटुंबियांना पंतप्रधान मदत निधीमधून प्रत्येकी 2-2 लाख रुपये भरपाई म्हणून देण्यास मंजुरी देण्यात आली आहे. तसेच जखमींना 50-50 हजार रुपये भरपाई म्हणून देण्याची घोषणा केली. परंतु नरेंद्र मोदींनी केवळ गुजरातलाच मदतीची घोषणा केली. त्यामुळे कॉंग्रेसने मोदींवर टीका केली आहे. दरम्यान, महाराष्ट्रात देखील फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे.