Home क्राईम कत्तलखान्यांवर रावेर पोलिसांचा ‘सर्जिकल स्ट्राईक’ ; गोवंश कत्तलीचे रॅकेट उघड

कत्तलखान्यांवर रावेर पोलिसांचा ‘सर्जिकल स्ट्राईक’ ; गोवंश कत्तलीचे रॅकेट उघड


रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रावेर शहरासह ग्रामीण भागात अवैध गोमांस विक्री आणि गोवंशाच्या कत्तलीविरुद्ध रावेर पोलिसांनी मोठी मोहीम उघडली आहे. गेल्या एका आठवड्यात रावेर आणि रसलपूर परिसरात गुन्हे शोध पथकाने विविध ठिकाणी छापे टाकून एकूण ३ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून पाच जणांना अटक केली आहे.

पहिली कारवाई: रावेर शहरात कत्तलखान्यावर छापा
रावेर शहरातील कुरेशी मोहल्ल्यात मस्तान शाह मशिदीजवळ गोवंशाची कत्तल करून मांस विक्री होत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. १ मे २०२६ रोजी सकाळी पथकाने येथे छापा टाकला असता, आरोपी शेख जावेद शेख सलीम कुरेशी, शेख अमजद शेख रहमान कुरेशी आणि शेख शकील शेख सलीम कुरेशी हे मांस विक्री करताना आढळून आले. त्यांच्याकडून १०० किलो गोमांस जप्त करण्यात आले असून महाराष्ट्र प्राणी सुधारणा अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसरी कारवाई: रसलपूरमध्ये राहत्या घरातून मांस जप्ती
२ मे २०२६ रोजी पहाटे रसलपूर येथील कुरेशी मोहल्ल्यात शेख अनिस शेख आयुब याच्या राहत्या घरावर पोलिसांनी छापा टाकला. तेथे आरोपी गोवंशाची कत्तल करून मांस विक्री करत असताना रंगेहात पकडला गेला. त्याच्याकडून ३०,००० रुपये किमतीचे १५० किलो मांस आणि कत्तलीसाठी लागणारी शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत.

तिसरी कारवाई: तस्करी करणारा ‘छोटा हत्ती’ पकडला
४ मे रोजी पहाटे रसलपूरकडून रावेरकडे जाणाऱ्या एका ‘छोटा हत्ती’ (क्रमांक MH 12 JF 6631) वाहनाची तपासणी केली असता, त्यात ५ गोवंश जातीचे बैल कत्तलीच्या उद्देशाने क्रूरपणे बांधून नेले जात असल्याचे उघड झाले. चालक अशपाक खान रज्जाक खान याला अटक करून ३ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सदर कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल, उपनिरीक्षक सुनील मोरे व गुन्हे शोध पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.


Protected Content

Play sound