Home Cities भुसावळ मोठी बातमी : भुसावळच्या नगराध्यक्षा गायत्री भंगाळे अपात्र; शासन आदेश जारी

मोठी बातमी : भुसावळच्या नगराध्यक्षा गायत्री भंगाळे अपात्र; शासन आदेश जारी


भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । येथील लोकनियुक्त नगराध्यक्षा गायत्री गौर-भंगाळे यांचे जात वैधता प्रमाणपत्र अवैध ठरल्यानंतर आता त्या अपात्र झाल्या असून याबाबतचे शासकीय आदेश आज जारी करण्यात आले आहेत.

अलीकडेच झालेल्या लोकनियुक्त नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी भुसावळचे नगराध्यक्षपद हे अनुसुचीत जाती महिला या प्रवर्गासाठी राखीव होते. यात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या वतीने गायत्री गौर-भंगाळे यांनी आपला उमेदवारी अर्ज सादर केला होता. आपल्या अर्जासोबत त्यांनी आपण एस.सी. प्रवर्गातील असल्याचे भुसावळच्या प्रांताधिकाऱ्यांनी दिलेले प्रमाणपत्र सादर केले होते. या निवडणुकीत त्यांनी मंत्री संजय सावकारे यांच्या सौभाग्यवती रजनीताई सावकारे यांचा धक्कादायक पराभव केला होता.

यानंतर गायत्री गौर-भंगाळे यांच्या जात प्रमाणपत्राबाबत आक्षेप घेऊन तक्रारी करण्यात आल्या होत्या. यावर चौकशी होऊन काही दिवसांपूर्वीच त्यांचे जात प्रमाणपत्र बनावट असल्याचा महत्वाचा निकाल जात पडताळणी समितीच्या वतीने देण्यात आला होता. यामुळे त्या नगराध्यक्षपदावरून पायउतार होणार असल्याचे संकेत मिळाले होते. आणी आज शासनाच्या वतीने हाच आदेश जारी करण्यात आला आहे.

या आदेशानुसार, दिनांक २३ एप्रिल रोजी गायत्री गौर यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरविले असून भूतलक्षी प्रभावानुसार त्यांना नगराध्यक्षपदावरून अपात्र करण्यात येत असल्याचे स्पष्ट नमूद करण्यात आले आहे. हा आदेश महाराष्ट्र शासनाच्या सहसचिव विद्या हम्पय्या यांच्या स्वाक्षरीने जारी करण्यात आला आहे. यामुळे भुसावळच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.


Protected Content

Play sound