अतिवृष्टीग्रस्त शेतीचे तातडीने पंचनामे करण्याची खा. खडसेंची मागणी

rakshatai khadse

मुक्ताईनगर प्रतिनिधी । परतीच्या पावसामुळे मुक्ताईनगर, यावल, रावेर, चोपडा, भुसावळ या तालुक्यासह जिल्ह्यात अतिवृष्टी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांचा तोंडी आलेला घास हिरावल्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात गेली आहे. यामुळे कृषी व महसूल विभागाने तातडीने अतिवृष्टीग्रस्त शेतीचे पंचनामे करावेत व त्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रशासनाने कार्यवाही सुरू करावी, अशी सूचना खासदार रक्षा खडसे यांनी आज जळगाव जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.

गेल्या चार-पाच दिवसांपासून परतीच्या पावसाने रिपरिप सुरू ठेवल्याने खरीप हंगामातील वेचणीला आलेली कपाशी, कापणीला आलेली ज्वारी बाजरी मका सोयाबीन सारख्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कापणीला आलेले पीक काळे पडले आहे. तसेच ज्वारी, बाजरी काळी पडली असून मका व चाऱ्याची नुकसान झाले असल्याचे शेतकऱ्यांनी संपर्क करुन कळविले आहे. सगळ्यात जास्त जास्त फटका कापसाला बसला आहे. कापूस खाली गळून पडल्याने अपेक्षित आलेले उत्पन्न बुडणार आहे. कापूस पिवळा व काळा पडला असून झाडावरच कोंब फुटल्याने शंभर टक्के शेतकर्‍यांचे नुकसान झाल्याचे परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांच्या हाताशी आलेले उत्पन्न परतीच्या पावसाने उध्वस्त झाले आहे. शेतकऱ्यांना आर्थिक संकटात नेणाऱ्या अतिवृष्टी ग्रस्त झालेल्या शेतीचे नुकसानीचे पंचनामे महसूल व कृषी भागाने तातडीने करावेत आपल्या संबंधित यंत्रणा आजच्या आज पंचनामे करण्यासाठी यंत्रणा कामाला लावावी, अशी मागणी खासदार रक्षाताई खडसे यांनी पत्रकान्वये केली आहे.

Protected Content