तेवातियाच्या धडाकेबाज खेळीने राजस्थान रॉयल्सचा विजय

अबूधाबी– तेवातियाने केलेल्या जोरदार फटकेबाजीने राजस्थान रॉयल्स संघाने किंग्ज इलेव्हन पंजाबवर रोमहर्षक विजयाची नोंद केली.

किंग्ज इलेव्हन पंजाबने त्यांना प्रथम फलंदाजीला पाचारण करणाऱ्या राजस्थान रॉयल्सची पॉवर प्लेमध्ये चांगलीच धुलाई केली. या धुलाईत गेल्या सामन्यात शतकी तडाखा देणारा कर्णधार केएल राहुल नाही तर मयांक अग्रवाल आघाडीवर होता. या दोघांनी ५ व्या षटकातच संघाचे अर्धशतक धावफलकावर लावले. यात मयांकच्या १३ चेंडूत २७ धावांचे मोठे योगदान होते. दरम्यान, केएल राहुलनेही आपला आक्रमक अंदाज दाखवत पंजाबला ६ षटकात ६० धावांपर्यंत पोहचवले.

किंग्ज इलेव्हन पंजाबने ठेवलेल्या २२४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्सनेही दमदार फलंदाजीचा नुमना पेश करत पंजाबचे टेन्शन वाढवले. यंदाच्या हंगामातील पहिला सामना खेळणारा जोस बटलर ४ धावांवर माघारी गेला. पण, त्यानंतर आलेल्या संजू सॅमसनने षटकारानेच सुरुवात करत आपले इरादे स्पष्ट केले. त्यानंतर सलामीला आलेला कर्णधार स्टीव्ह स्मिथ रंगात आला. त्यानेही चौफेर फटकेबाजी करत पॉवर प्लेचा फायदा उचलण्यास सुरुवात केली. या दोघांनी यंदाच्या हंगामातील आतापर्यंतच्या सामन्यातील पॉवर प्लेमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा याच सामन्यात पंजबने केलेला विक्रम मोडीत काढत ६ षटकात तब्बल ६९ धावा ठोकल्या. स्मिथने आपले २६ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. पण, या अर्धशतकानंतर स्मिथ निशेमच्या गोलंदाजीवर बाद झाला. संजू सॅमसनने आपले अर्धशतक २७ चेंडूत पार केले. पण, दुसऱ्या बाजूने राहुल तेवातियाने जास्त चेंडू डॉट घालवल्याने पंजाबची धावगती धिमी पडली.
अखेर सॅमसन बाद झाल्यानंतर तेवातियाने १८ वे षटक टाकणाऱ्या कॉट्रेलला चार चेंडूवर चार षटकार मारत मागचा सर्व बॅकलॉक भरून काढला. त्याने षटकाच्या सहाव्या चेंडूवरही षटकार मारून ३० धावा वसूल करुन घेतल्या. यामुळे राजस्थानला विजयासाठी १२ चेंडूत २१ धावांची गरज होती. पण, १९ वे षटक टाकणाऱ्या शामीने रॉबिन उथाप्पाला बाद करुन राजस्थानला चौथा धक्का दिला. उथाप्पानंतर आलेल्या जोफ्रा आर्चरने सलग दोन षटकार मारत सामना ९ चेंडूत ९ धावा असा आवाक्यात आणला. त्यानंतर अजून एक षटकार मारत विजय सोपा केला. अखेरच्या षटकात मुरगन अश्विनने विकेट मिळवत पंजाबसाठी थोडी उत्सुकता निर्माण केली. पण, टॉम कुरेनने विजयी चौकार मारत संजू सॅमसन, स्मिथ आणि तेवातिया यांच्या कष्टाला विजयी फळ मिळवून दिले.

Protected Content