पावसाळा, कोरोना आणि सणवार एकत्र आल्याने अधिक काळजी घेण्याची गरज – मुख्यमंत्री

पुणे– कोरोनाबाधित रुग्णांवर उपचारासाठी सुविधांची उभारणी राज्यभर सुरु असून पावसाळा, कोरोनाचा प्रादुर्भाव आणि सणवार एकत्र आल्याने अधिक काळजी घेण्याची गरज असल्याचे मत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज व्यक्त केले.

शिवाजीनगर येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या (सीओईपी) परिसरात कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी उभारण्यात आलेल्या कोविड रुग्णालयाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन लोकार्पण झाले यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार कार्यक्रमस्थळी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांनी सर्वांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. कोरोनामुळे सर्वधर्मियांनी आतापर्यंतचे सगळे सण साधेपणाने घरातच साजरे करून शासनाला सहकार्य केल्याबद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानले. ते म्हणाले, पुणे शहरातील गणेशोत्सव पाहण्यासाठी परदेशातून नागरिक येत असतात, श्री गणेशाची प्रतिष्ठापना आपण दरवर्षीप्रमाणे यंदाही केली आहे, मात्र यावेळेस आपल्यासमोर कोरोनाचे विघ्न आहे. या विघ्नातून लवकरात लवकर मुक्ती मिळावी तसेच सामाजिक भान ठेऊन शांततेत यंदाचा गणेशोत्सव आपण साजरा करूया, अशी अपेक्षा व्यक्त करून मुख्यमंत्री ठाकरे यांनी संपूर्ण गणेशोत्सव काळात गर्दी होणार नाही, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही याची प्रत्येकाने काळजी घ्यावी असे आवाहन करतानाच कोणीही गाफील न राहता आतापर्यंत आपण जी काळजी घेतो आहोत, तीच पुढेही घेणे आवश्यक आहे तसेच मास्कचा नियमित वापर करावा, वारंवार हात धुणे, वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छता तसेच सुरक्षित अंतर यावर भर देणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले.

Protected Content