Home Cities धुळे दोंडाईच्यात गॅस वितरणावर प्रश्नचिन्ह; घरपोच सेवा बंद, अतिरिक्त दर आकारल्याचा शिवसेनेचा गंभीर...

दोंडाईच्यात गॅस वितरणावर प्रश्नचिन्ह; घरपोच सेवा बंद, अतिरिक्त दर आकारल्याचा शिवसेनेचा गंभीर आरोप


धुळे-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । दोंडाईचा शहरात गॅस टंचाई नसतानाही नागरिकांना घरपोच गॅस सेवा दिली जात नसल्याचा तसेच अतिरिक्त दर आकारून सिलेंडर वितरण केल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी, यांच्याकडे दोंडाईचा शिवसेना ठाकरे गटाचे उप शहरप्रमुख
दिपक ओतारी निवेदन सादर करण्यात आले असून संबंधित गॅस एजन्सीवर चौकशी करून कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

निवेदनात नमूद केल्यानुसार, सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे पेट्रोल, डिझेल आणि गॅस पुरवठ्याबाबत नागरिकांमध्ये विविध अफवा पसरत होत्या. मात्र जिल्हाधिकारी कार्यालयाकडून काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध करण्यात आलेल्या व्हिडिओद्वारे जिल्ह्यात इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध असून नागरिकांनी घाबरून जाऊन गर्दी करू नये, असे आवाहन करण्यात आले होते.

असे असतानाही दोंडाईचा येथील अमित गॅस सर्व्हिसकडून नागरिकांना घरपोच सेवा न देता थेट गोडाऊनवर सिलेंडर वाटप केले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. धुळे रोडवरील गोडाऊन परिसरात नागरिकांच्या एक ते दीड किलोमीटरपर्यंत रांगा लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे वृद्ध, महिला आणि गरीब नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचा दावा करण्यात आला आहे.

गोरगरीब आणि गरजू नागरिकांपर्यंत वेळेवर घरगुती गॅस पोहोचत नसल्याने त्यांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होत असल्याचेही निवेदनात म्हटले आहे. विशेषतः उन्हाळ्याच्या तीव्र वातावरणात तासन्तास रांगेत उभे राहून सिलेंडर घेण्याची वेळ नागरिकांवर येत असल्याने प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

याशिवाय दोंडाईचा शहरातील काही मोठी हॉटेल्स, बिअर बार आणि व्यावसायिकांना जास्तीचा दर घेऊन घरगुती गॅस सिलेंडर पुरवठा केला जात असल्याचाही गंभीर आरोप करण्यात आला आहे. व्यावसायिक वापरासाठी कमर्शियल गॅस वापरणे अपेक्षित असताना काही ठिकाणी घरगुती सिलेंडरचा वापर होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. यामुळे शासनाच्या नियमांचे उल्लंघन होत असून सामान्य ग्राहकांवर अन्याय होत असल्याची भावना व्यक्त करण्यात आली आहे.

निवेदनासोबत गॅस गोडाऊन आणि पेट्रोल पंप परिसरातील गर्दीचे छायाचित्रे जोडण्यात आल्याची माहितीही देण्यात आली आहे. संबंधित प्रकाराची सखोल चौकशी करून दोषींवर योग्य ती कारवाई करण्यात यावी तसेच सर्वसामान्य नागरिकांना सुरळीत घरपोच गॅस सेवा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.

या निवेदनाच्या प्रती पालकमंत्री तथा कॅबिनेट राजशिष्टाचार व पणन मंत्री जयकुमार रावल, शिवसेना ग्रामीण जिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे, अप्पर तहसीलदार दोंडाईचा तसेच पोलीस निरीक्षक दोंडाईचा यांनाही सादर करण्यात आल्या आहेत.


Protected Content

Play sound