मुंबई-वृत्तसेवा। सर्वसामान्यांच्या खिशाला पुन्हा एकदा मोठा फटका बसला असून अवघ्या चार दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये दुसऱ्यांदा वाढ करण्यात आली आहे. मंगळवारपासून लागू झालेल्या नव्या दरांनुसार पेट्रोलच्या दरात 91 पैशांनी तर डिझेलच्या दरात 94 पैशांनी वाढ झाली आहे. त्यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पेट्रोलचे दर 109 रुपयांच्या घरात पोहोचले असून नागरिकांमध्ये संतापाची भावना व्यक्त होत आहे.
यापूर्वी 15 मे रोजी पेट्रोलच्या दरात तब्बल 3 रुपये आणि डिझेलच्या दरात 3.11 रुपयांची वाढ करण्यात आली होती. त्यानंतर अवघ्या चार दिवसांत पुन्हा एकदा दरवाढ झाल्याने वाहनधारक आणि सर्वसामान्य नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे. मुंबईमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 107.49 रुपये तर डिझेलचा दर 94.02 रुपयांवर पोहोचला आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाच्या किंमतींमध्ये मोठी वाढ झाल्यामुळे भारतीय पेट्रोलियम कंपन्यांवर आर्थिक ताण वाढल्याचे सांगितले जात आहे. इराण, अमेरिका आणि इस्रायल यांच्यातील वाढत्या तणावामुळे जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या किंमतींमध्ये चढ-उतार सुरू असून त्याचा थेट परिणाम भारतीय बाजारपेठेवर होताना दिसत आहे. विधानसभा निवडणुका संपल्यानंतर केंद्र सरकारने इंधन दरवाढीचा काही भार ग्राहकांवर टाकल्याची चर्चा देखील सुरू झाली आहे.
राज्यातील विविध जिल्ह्यांमधील इंधनाचे नवे दर जाहीर करण्यात आले असून काही जिल्ह्यांमध्ये पेट्रोलचे दर 109 रुपयांपेक्षा अधिक झाले आहेत. नागपूरमध्ये पेट्रोलचा दर 108.06 रुपये तर डिझेलचा दर 94.63 रुपये झाला आहे. भंडारा जिल्ह्यात पेट्रोल 108.69 रुपये आणि डिझेल 95.24 रुपयांवर पोहोचले आहे.
पुण्यात पेट्रोलचा दर 107.86 रुपये झाला असून त्यात 91 पैशांची वाढ झाली आहे. डिझेलचा दर 94.40 रुपये असून त्यात 94 पैशांची वाढ झाली आहे. सोलापूरमध्ये पेट्रोल 108.21 रुपये तर डिझेल 94.75 रुपये इतके झाले आहे. नाशिकमध्ये पेट्रोल 108.84 रुपये आणि डिझेल 95.35 रुपये दराने विकले जात आहे.
कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात पेट्रोलचा दर 109.53 रुपये आणि डिझेलचा दर 96.06 रुपये झाला आहे. परभणीमध्ये पेट्रोल 109.49 रुपये तर डिझेल 95.96 रुपये झाले आहे. कोल्हापुरात पेट्रोल 108.37 रुपये आणि डिझेल 94.93 रुपये दराने विकले जात आहे.
विदर्भातील वाशीममध्ये पेट्रोल 108.95 रुपये तर डिझेल 95.49 रुपये झाले आहे. अमरावतीमध्ये पेट्रोल 109.15 रुपये आणि डिझेल 95.68 रुपये दराने विकले जात आहे. गोंदिया जिल्ह्यात पेट्रोल 109.54 रुपये आणि डिझेल 96.08 रुपये इतके झाले असून राज्यातील सर्वाधिक दरांपैकी हे दर मानले जात आहेत.
सिंधुदुर्गमध्ये पेट्रोलचा दर 109.55 रुपये तर डिझेलचा दर 96.07 रुपये झाला आहे. रायगडमध्ये पेट्रोल 108.82 रुपये आणि डिझेल 95.30 रुपये झाले आहे. शेजारील गोव्यात मात्र महाराष्ट्राच्या तुलनेत इंधनाचे दर काहीसे कमी असून पेट्रोल 101.25 रुपये तर डिझेल 92.99 रुपये दराने विकले जात आहे.
इंधन दरवाढीचा थेट परिणाम वाहतूक खर्च, मालवाहतूक, शेती आणि दैनंदिन गरजेच्या वस्तूंवर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आगामी काळात आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किंमती आणखी वाढल्यास पेट्रोल आणि डिझेलचे दर पुन्हा वाढू शकतात, अशी भीती व्यक्त होत आहे.



