Home Cities बोदवड घरकुल योजनेत मोठा घोटाळा! बनावट जिओ टॅग करून शासनाची लाखो रुपयांची फसवणूक

घरकुल योजनेत मोठा घोटाळा! बनावट जिओ टॅग करून शासनाची लाखो रुपयांची फसवणूक


बोदवड-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । बोदवड पंचायत समिती अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध शासकीय घरकुल योजनांमध्ये कंत्राटी कर्मचाऱ्यांनी संगनमत करून शासनाची आणि खऱ्या गरजूंची मोठी फसवणूक केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. प्रत्यक्ष जागेवर घरकुलांचे कोणतेही बांधकाम झालेले नसताना, बोगस फोटो काढून आणि बनावट जिओ टॅगिंग करून या योजनांचे काम पूर्ण झाल्याचे ऑनलाईन संकेतस्थळावर दाखवण्यात आले आहे. लाभार्थ्यांकडून मोठा आर्थिक मलिदा लाटून अपूर्ण कामांचेही देयके अदा करण्यात आल्याचा गंभीर आरोप करत या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी तक्रारदार गजानन कडू गवळी यांनी गटविकास अधिकारी रमेश बी. सपकाळे आणि बांधकाम विभागाचे शाखा अभियंता बागुल यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

या संदर्भात प्राप्त माहितीनुसार, बोदवड पंचायत समितीच्या ग्रामीण घरकुल गृहनिर्माण योजना विभागात कार्यरत असलेले गृहनिर्माण अभियंता लोकेश सरोदे, जीवन पाटील आणि गजानन पाटील हे तालुक्यातील प्रधानमंत्री आवास योजना, रमाई घरकुल योजना, मोदी आवास योजना आणि शबरी आवास योजना या सर्वच योजनांमध्ये मोठ्या प्रमाणावर अनियमितता करत असल्याचे समोर आले आहे. हे कंत्राटी अभियंते प्रत्यक्ष घटनास्थळी न जाता, चुकीच्या जागांचे जिओ टॅग करून परस्पर बोगस फोटो ऑनलाईन प्रणालीवर अपलोड करत आहेत. सन २०२१-२२ पासून आजतागायत तालुक्यातील अनेक घरकुलांची कामे अपूर्ण अवस्थेत असतानाही त्यांचे पूर्ण पेमेंट कशाच्या आधारे वर्ग करण्यात आले, असा सवाल आता उपस्थित केला जात असून या भ्रष्टाचाराला पंचायत समितीचे संबंधित आर.एच.ई. अधिकारीच सर्वस्वी जबाबदार असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
शासकीय नियमांनुसार घरकुल योजनेचा शेवटचा हप्ता वितरित करण्यापूर्वी संबंधित जागेचा नमुना नंबर आठचा उतारा घेणे कायदेशीररीत्या बंधनकारक असते. मात्र, बोदवड पंचायत समितीत कोणत्याही प्रकारचे उतारे न घेताच कंत्राटी अभियंत्यांनी चुकीच्या पद्धतीने जिओ टॅग फोटो अपलोड करून शासनाचा लाखो रुपयांचा निधी वर्ग केला आहे. यामुळे खऱ्या गरजू लाभार्थ्यांचे मोठे नुकसान झाले असून शासकीय निधीचा सर्रास अपव्यय झाला आहे. या कल्याणकारी योजनांचा बोदवड तालुक्यात पुरता बोजवारा उडाला असून ‘दूध का दूध आणि पाणी का पाणी’ करण्यासाठी गटविकास अधिकारी रमेश सपकाळे यांनी स्वतः आपल्या शासकीय दौऱ्यात किमान एका गावातील १० घरकुलांची प्रत्यक्ष जागेवर जाऊन चौकशी करावी, जेणेकरून या रॅकेटचा पर्दाफाश होईल आणि गरीब लाभार्थ्यांना न्याय मिळेल, अशी आग्रही मागणी गजानन गवळी यांनी केली आहे.


Protected Content

Play sound