मुंबई प्रतिनिधी । पूजा चव्हाण या युवतीचा मृत्यू डोके व मणक्याच्या जबर दुखापतीमुळे झाल्याची माहिती शवविच्छेदनाच्या अहवालातून समोर आले आहे.
पूजा चव्हाण या युवतीचा मृत्यू चर्चेचा विषय बनला आहे. यामुळे वन मंत्री संजय राठोड यांना राजीनामा द्यावा लागला आहे. तर तिचा खून झाला की आत्महत्या ? याबाबत संशयकल्लोळ देखील निर्माण झाला आहे. मात्र याचे रहस्योदघाटन झाल्याचा दावा करण्यात येत आहे. पूजाच्या पोस्टमार्टम रिपोर्टमधून याबाबतची माहिती समोर आल्याचा दावा एबीपी-माझा या मराठी वृत्तवाहिनीने केला आहे.
या वृत्तवाहिनीनुसार- पूजा चव्हाणच्या शवविच्छेदनाचा सविस्तर अहवाल वानवडी पोलिसांना प्राप्त झाल्याचं कळत आहे. प्राथमिक अहवालाप्रमाणेच सविस्तर अहवालातही जबर दुखापतीनेच पूजा चव्हाणचा मृत्यु झाल्याचं स्पष्ट होत आहे. पूजा चव्हाणच्या आत्महत्येच्या किमान मुळ कारणापर्यंत पोहोचू शकणारा सविस्तर शवविच्छेदन अहवालही वानवडी पोलिसांना प्राप्त झाला आहे.
या संपूर्ण प्रकरणावर मात्र पोलिसांकडून कुठलीही अधिकृत प्रतिक्रिया मिळू शकलेली नाही. पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणाचा तपास सध्या सुरु आहे, त्यामुळे तपास पूर्ण झाल्यावरच याविषयीची अधिक माहिती दिली जाईल असे या प्रकरणाचा तपास अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.