Home प्रशासन तहसील भुसावळ प्रांत कार्यालयातील ‘जन समाधान बैठक’ यशस्वी ; नागरिकांच्या तक्रारींवर तातडीने कारवाईचे...

भुसावळ प्रांत कार्यालयातील ‘जन समाधान बैठक’ यशस्वी ; नागरिकांच्या तक्रारींवर तातडीने कारवाईचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

0
15

भुसावळ-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । भुसावळ प्रांत कार्यालयात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या ‘जन समाधान बैठकी’त भुसावळ, मुक्ताईनगर आणि बोदवड तालुक्यातील नागरिकांनी विविध मूलभूत समस्यांचा पाढा प्रशासनासमोर मांडला. नागरिकांच्या प्रलंबित तक्रारींना तातडीने न्याय मिळावा आणि विविध विभागांतील प्रश्नांचे जलद निराकरण व्हावे, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीत संबंधित विभागांना त्वरित कार्यवाहीचे स्पष्ट निर्देश देण्यात आले.

बैठकीस महसूल, आरोग्य, वन, महावितरण, पंचायत समिती, सर्वे विभाग तसेच इतर विविध शासकीय विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. नागरिकांनी पाणीपुरवठा, वीज, महसूल, आरोग्य सेवा, वनविषयक अडचणी, जमिनीचे वाद, सर्वेक्षण, तसेच विविध शासकीय योजनांशी संबंधित प्रश्न मांडले. प्रत्येक तक्रारीची विभागनिहाय नोंद घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना निश्चित कालमर्यादेत आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी नागरिकांच्या समस्यांकडे संवेदनशीलतेने पाहण्याच्या सूचना देत, प्रलंबित प्रकरणांचा तत्काळ निपटारा करण्यावर भर दिला. शासकीय योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत वेळेत पोहोचावा तसेच कोणत्याही प्रकारची दिरंगाई अथवा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

बैठकीदरम्यान विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या विभागांशी संबंधित तक्रारींची माहिती सादर केली. नागरिकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर संबंधित अधिकाऱ्यांशी थेट चर्चा करण्यात आली. काही तक्रारींचे तत्काळ निराकरण करण्यात आले, तर उर्वरित प्रकरणांवर लवकरात लवकर कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले. भुसावळ, मुक्ताईनगर आणि बोदवड या तिन्ही तालुक्यांतील अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या प्रश्नांना या बैठकीमुळे गती मिळाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. प्रशासनाने नागरिकांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या ऐकून घेतल्याबद्दल उपस्थितांनी या उपक्रमाचे स्वागत केले.


Protected Content

Play sound