जळगाव, प्रतिनिधी । राज्यात अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील शेतमालाचे नुकसान झाले असून त्याच्या भरपाई पोटी शासनाने लवकरात लवकर मदत द्यावी अशी मागणी शिवशंभू संघटनेतर्फे जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
महाराष्ट्रात अतिवृष्टी होत असल्याने शेतीमालाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. पंधरा दिवसापूर्वी प्रशासनाकडून बऱ्याच ठिकाणी नुकसानीचे पंचनामे करण्यात आले. परंतु, यानंतर देखील मुसळधार पाऊस झाल्याने पंचनाम्यानंतरची परिस्थिती अधिक गंभीर झाली आहे. यात देखील शासनाकडून मिळणारी आर्थिक तोकडी मदत अद्यापही शेतकऱ्यांना मिळालेली नाही. अशा नैसर्गिक संकटाच्या काळात प्रशासनाकडून शेतकऱ्यांना एकेरी २५ हजार रुपयांची मदत थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात यावेत तसेच दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिलिटर ३० रुपये भाव देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे.
आगामी १० दिवसात मागण्यांची पूर्तता न झाल्यास शिवशंभू शेतकरी आघाडीतर्फे ३ ऑक्टोबर रोजी राज्यातील तहसील कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवशीय उपोषण करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. निवेदनावर जिल्हाध्यक्ष नितीन पाटील, जिल्हा संघटक आनंद घुगे, जिल्हा उपाध्यक्ष सोपान मानकर यांची स्वाक्षरी आहे.