पाणी वाचविणे म्हणजे धर्माचे आचरण : ऋषीकेश जोशी-महाराज

जळगाव (प्रतिनिधी) तहानलेल्या पाणी देणे, भुकेने व्याकुळ झालेल्यांची भुक भागविणे, पशू-पक्षी यांची सेवा, वृक्ष जोपासून निसर्गाची सेवा करणे हे आपल्या धर्मात शिकविले आहे. जे परमार्थाला आवडते ते जोपासण्याची आपली संस्कृती याचे कृतिशील आचरण करण्यासाठी संतांनीही विविध मार्ग सांगितले. पाणी परमेश्वराला अत्यंत प्रिय त्यामुळेच पाणी वाचविणे म्हणजे खऱ्या अर्थाने धर्माचे आचरण करणे होय. असे प्रबोधन जलसप्ताहामध्ये आज झालेल्या कीर्तनात हरि भक्त परायण ऋषीकेश जोशी-महाराज यांनी केले.

 

जागतिक जलदिनाच्या पार्श्वभुमिवर गांधी रिसर्च फाऊंडेशन, भवरलाल एण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन, जैन इरिगेशन सिस्टिम्स लि., जलश्री आणि नीर फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने जलसप्ताहाअंतर्गत आज भाऊंचे उद्यान येथे रामकृष्ण हरिचा गजर करण्यात आला. पाणी बचतीच्यादृष्टीने वारकरी संप्रदयामधील दाखले देत ऋषीकेश जोशी-महाराज यांनी श्रोत्यांना पाणी बचतीचे महत्त्व पटवून दिले. ‘जोडोनीया धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेचकरी’ हा संत तुकाराम महाराजांचा अभंग निरूपणासाठी घेतला होतो. मनुष्याच्या आयुष्यात धन म्हणजे वृक्ष, पाणी, माती, हवा हेच होय. याचे उत्तम व्यवहाराने वापर केल्यानेच पर्यावरणाचे संवर्धन करता येईल असे सांगितले. भवरलालजी जैन यांनी आयुष्यभर याच बाबींवर व्रतस्थपणे कार्य केले. अभंगाचे निरूपण करीत असताना त्यांनी समर्थ रामदास, संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम यांच्या साहित्याचे दाखले देत पाणी, वृक्ष आणि निसर्गाचे संतूलन राखण्यासाठी मानवाने करण्याचे प्रयत्न सांगितले. संपूर्ण जगाला सुधरविण्यापेक्षा पाणी बचतीची सुरवात आपण स्वतःपासून केली पाहिजे असे सांगत पाण्याच संबंध पुंडलिकाशी आहे. पाण्याने मानवासह सृष्टीला शुद्धता प्राप्त होत असते त्यामुळे सृष्टीचे संवर्धन करावयाचे असेल तर पाण्याची बचत करणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.

 

यावेळी ह.भ.प. श्रीराम महाराज यांच्यासह विनोद जाधव (मृदंगाचार्य), उमेश सूर्यवंशी (हार्मानियम), शांताराम चौधरी (विणेकरी), ललित सूर्यवंशी, पवन भोई, राजेंद्र पाटील, सुरेश जाधव, दगडू मराठे यांनी गायनाचार्य व टाळकरी म्हणून साथसंगत दिली. ऋषीकेश महाराज यांचा परिचय जैन इरिगेशनचे सहकारी किशोर कुळकर्णी यांनी केला. दिनेश दीक्षित यांनी सुत्रसंचालन केले.

 

जागतिक जलदिनानिमित्त आज भव्य जल दिंडीचे आयोजन

 

जलसप्ताहानिमित्त १६ मार्च पासून विविध उपक्रमांद्वारे जल जागृतीचा जागर सुरू आहे. उद्या दि. २२ मार्च रोजी जागतिक जलदिन. त्यानिमित्त महात्मा गांधी उद्यान येथून सकाळी ७.३० वाजेला भव्य जल दिंडी काढून ‘जल है तो कल है’ चा नारा दिला जाणार आहे. महात्मा गांधी उद्यान येथून सुरू झालेली जल दिडींचा समारोप भाऊंचे उद्यान येथे होईल. तसेच संध्याकाळी ६.३० वाजेला भाऊंचे उद्यान येथे जलसप्ताहामध्ये घेण्यात आलेल्या पथनाट्य स्पर्धेचे पारितोषिक वितरण करण्यात येणार आहे. याठिकाणी उपस्थितीचे आवाहन गांधी रिसर्च फाऊंडेशन, भवरलाल एण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन, जैन इरिगेशन सिस्टिम्स, मु. जे. महाविद्यालयातील जलश्री विभाग, नीर फाऊंडेशन यांच्यातर्फे करण्यात आले आहे.

Add Comment

Protected Content