श्री मंगळग्रह जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर शहरातील श्री मंगळदेव ग्रह येथे श्री मंगळदेव ग्रह जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील श्री मंगळदेव ग्रह मंदिरात दरवर्षी तिथीप्रमाणे भाद्रपद शुद्ध दशमीला श्री मंगळदेव ग्रहाचा जन्मोत्सव साजरा होतो. इंग्रजी तारखेप्रमाणे ५ सप्टेंबर रोजी श्री मंगळ जन्मोत्सव पारंपारिक पद्धतीने साजरा होणार आहे. हा जन्मोत्सव म्हणजे मंदिराचा वर्षभरातील सर्वात मोठा व परम पवित्र दिवस मानला जातो. यानिमित्ताने मंदिर व परिसराला पाने फुले व रांगोळ्यांनी सजविले जाईल. सर्वत्र रोषणाई केली जाईल. मंदिरात पहाटे पाचला विशेष पंचामृत अभिषेक होईल. देवाला ५६ भोग अर्पण केले जातील.

जन्मोत्सव सकाळी साडेसहा वाजता होईल. या दिवशी मंदिरातील सर्व ध्वज विधिवतरीत्या बदलले जातील. दुपारी दोन वाजता महाभोमयागास प्रारंभ होईल. सायंकाळी ६ वाजता महाआरती होईल. भाविकांनी सकाळी ७.३० ते रात्री ९ वाजेपर्यंत येऊन तीर्थ प्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंगळग्रह सेवा संस्थेच्या विश्वस्त मंडळाने केले आहे.

Protected Content