रावेर प्रतिनिधी । रावेर शहरात वारंवार होणार्या जातीय दंगलीमुळे शहरातील काही भाग कायम अशांत क्षेत्र म्हणून घोषित करण्याबाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आज अपर मुख्य सचिव गृह विभाग यांना सादर केला आहे.
लॉकडाऊन मध्ये २२ मार्चच्या रावेर शहरातील उसळलेल्या दंगली नंतर प्रशासन सतर्क झाले आहे.दंगलीत झालेली नुकसान भरपाई दंगलखोरा कडून वसूल करण्याचा प्रस्ताव अप्पर पोलिस अधीक्षक भाग्यश्री नवटके यांनी जिल्हाधिकार्यांकडे सादर केला आहे. यानंतर आता रावेर शहर कायम अशांत क्षेत्र घोषित करण्यासाठी आज जिल्हाधिकार्यांनी अपर मुख्य सचिव गृह विभाग यांना हा प्रस्ताव पाठवला आहे.
या प्रस्तावाच्या अंतर्गत रावेर शहरातील नागझिरी भाग,रसलपुर नाका,लेंडीपूरा,कोतवालवाडा,चावडी चौक,शिवाजी चौक,भोई वाडा,संभाजी नगर,इमामबाडा,पंचशील चौक,बंडु चौक, खाटीक वाडा,मन्यार वाडा , गांधी चौक , हातेशा मस्जिद थळा भाग , पाराचा गणपती , महात्मा फुले चौक आठवडे बाजार इत्यादी क्षेत्र हे कायम अशांत क्षेत्र घोषित करण्याचा प्रशासन विचार करत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. याला सचिवांनी मान्यता दिल्यास संबंधीत क्षेत्र हे कायम अशांत क्षेत्र म्हणून घोषीत करण्यात येणार आहेत.
दरम्यान, तीन शहरांमधील लॉकडाऊन यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल जिल्हाधिकार्यांनी जनतेचे आभार मानले आहेत. यापुढे ६ जुलैपर्यंत ज्या प्रकारे नियम होते. त्याच प्रकारचे नियम हे १४ जुलैपासून सुरू राहतील अशी माहिती देखील त्यांनी दिली.