खुनाच्या गुन्ह्यातील ३० लाखांचा मुद्देमाल मयताच्या वारसांना परत !


जळगाव -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुका पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या एका खून प्रकरणातील अटक केलेल्या आरोपींकडून जप्त करण्यात आलेली ३० लाख रुपये रक्कम सोमवारी २३ जून रोजी दुपारी १ वाजता मयत महिलेच्या नातेवाईकांना परत करण्यात आली. अशी माहिती पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी यांनी दिली आहे.

अधिक माहिती अशी की, नाशिक येथील रहिवाशी असलेल्या सेवानिवृत्त परिचारीका असलेल्या स्नेहलता अनंत चुंबळे यांच्याजवळील ३० लाख रुपये मिळवण्याच्या लालसेपोटी कट रचला २० ऑगस्ट २०२४ रोजी सायंकाळी सव्वा सहा वाजेच्या सुमारास संशयित आरोपी जिजाबराव अभिमन्यू पाटील (वय ४८, रा. अमळनेर, मूळ रा. खडकीसिम, ता. चाळीसगाव) आणि विजय रंगराव निकम (वय ४६, रा. अमळनेर, मूळ रा. विचखेडा, ता. पारोळा) यांनी कट रचला होता. दोघांनी स्नेहलता चुंबळे यांचा खून केला आणि त्यांच्या प्रेताची कुठेतरी विल्हेवाट लावल्याचा प्रकार समोर आला होता.याबाबत जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होवून दोघांना अटक करण्यात आली होती. त्यांच्याकडून ३० लाख रूपयांची रोकड जप्त करण्यात आली होती. हे दोन्ही आरोपी जिल्हा परिषद, जळगाव येथे नेमणुकीला होते. जळगाव जिल्हा सत्र न्यायालयाच्या आदेशानुसार पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी यांनी फिर्यादी समीर उर्फ सौरभ संजय देशमुख आणि नातेवाईक संजय नानासाहेब देशमुख यांना ही रक्कम ताब्यात देण्यात आली आहे.