अपघातानंतर नागरिक संतप्त, रावेरात प्रशासनाला पकडून दिले तीन डंपर !


रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रावेर तालुक्यात सुरू असलेल्या अवैध मुरुम वाहतुकीविरोधात आता नागरिकांनीच पुढाकार घेतला आहे. सावखेडा रस्त्यावर भरधाव वेगाने मुरुम घेऊन जाणारे तीन डंपर संतप्त नागरिकांनी थेट पकडले आणि प्रशासनाच्या ताब्यात दिले. या घटनेमुळे अवैध मुरुम वाहतूक करणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

अपघातानंतर नागरिक आक्रमक
मिळालेल्या माहितीनुसार, रावेर तालुक्यातील सावखेडा रस्त्यावरून मुरुमाने भरलेले तीन डंपर भरधाव वेगात जात असताना, एका डंपरने दुचाकीस्वाराला धडक दिली. यात दुचाकीस्वार जखमी झाला. हा प्रकार पाहून स्थानिक नागरिक प्रचंड आक्रमक झाले. त्यांनी तात्काळ एकत्र येत तिन्ही डंपर थांबवले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. नागरिकांनी या डप्तरांना सावदा पोलीस स्टेशनच्या माध्यमातून रावेर तहसील कार्यालयात जप्त करून दिले. या घटनेनंतर महसूल आणि पोलीस प्रशासनाने तातडीने तपास सुरू केला आहे.

शासकीय महसुलाचे नुकसान, अपघातांची वाढ
सध्या रावेर तालुक्यात अनेक ठिकाणी मुरुमाचा साठा असलेल्या टेकड्या जेसीबीच्या साहाय्याने सर्रास पोखरल्या जात आहेत. यातून काढलेला मुरूम कोणत्याही प्रकारच्या परवानग्या न घेता डंपरद्वारे मोठ्या प्रमाणात वाहतूक केला जात आहे. यामुळे एकीकडे शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत आहे, तर दुसरीकडे ओव्हरलोड आणि बेफिकीर वाहतुकीमुळे रस्त्यांवरील अपघातांचे प्रमाणही वाढले आहे.

नागरिकांकडून ठोस कारवाईची मागणी
या गंभीर प्रकाराला आळा घालण्यासाठी प्रशासनाने कठोर आणि ठोस पावले उचलावीत, अशी मागणी आता तालुक्यातील नागरिकांकडून जोर धरू लागली आहे. जनतेनेच थेट कारवाई केल्याने आता प्रशासन यावर काय उपाययोजना करते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.