Home क्राईम लग्नपत्रिकेच्या नावाखाली व्हॉट्सअ‍ॅप सायबर फसवणूक ; खात्यातून ९१ हजार रुपये गायब

लग्नपत्रिकेच्या नावाखाली व्हॉट्सअ‍ॅप सायबर फसवणूक ; खात्यातून ९१ हजार रुपये गायब


मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगर शहरात सायबर गुन्हेगारीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, लग्नपत्रिकेच्या नावाखाली पाठविण्यात आलेली बनावट APK फाईल उघडताच एका नागरिकाच्या बँक खात्यातून तब्बल ९१ हजार रुपये परस्पर काढण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून सायबर सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मुक्ताईनगर येथील वासुदेव भंगाळे यांना 7 मे रोजी त्यांच्या मित्राच्या व्हॉट्सअ‍ॅप नंबरवरून लग्नपत्रिकेचा मेसेज प्राप्त झाला. संदेश परिचित व्यक्तीकडून आल्याने त्यांनी कोणताही संशय न घेता त्या मेसेजसोबत पाठवलेली APK फाईल मोबाईलमध्ये उघडली. मात्र, फाईल ओपन करताच सायबर हॅकर्सनी त्यांच्या मोबाईलमधील बँकिंग माहितीचा ताबा घेत खात्यातून 91 हजार रुपये लंपास केले.

या प्रकारानंतर धक्कादायक बाब म्हणजे संबंधित मित्राचा व्हॉट्सअ‍ॅप अकाउंटही हॅक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे सायबर गुन्हेगार आता ओळखीच्या व्यक्तींची खाती हॅक करून त्याच्याच नावाने बनावट मेसेज पाठवत असल्याचे स्पष्ट झाले आहे. या नव्या प्रकारामुळे नागरिकांमध्ये मोठी भीती निर्माण झाली आहे.

खात्यातून रक्कम गायब झाल्याचे लक्षात येताच वासुदेव भंगाळे यांनी तात्काळ सायबर क्राईम विभागाकडे ऑनलाइन तक्रार दाखल केली असून, या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे. प्राथमिक तपासात ही घटना अत्याधुनिक सायबर फसवणूक पद्धतीने घडविण्यात आल्याचे समोर आले आहे.

सायबर तज्ज्ञांच्या मते, अशा APK फाईल्सद्वारे मोबाईलमध्ये मालवेअर टाकून बँकिंग माहिती, ओटीपी तसेच वैयक्तिक डेटा सहज हॅक केला जातो. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अनोळखी किंवा संशयास्पद फाईल्स, लिंक किंवा मेसेज उघडू नयेत, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच ओळखीच्या व्यक्तीकडून मेसेज आला तरी त्याची खातरजमा केल्याशिवाय कोणतीही फाईल डाउनलोड करू नये, असा इशाराही देण्यात आला आहे.


Protected Content

Play sound