जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पश्चिम क्षेत्राचा ‘कार्यकर्ता विकास वर्ग-१’ यंदा जळगाव शहरात भव्य स्वरूपात आयोजित करण्यात आला असून 10 मे ते 30 मे 2026 या कालावधीत के.सी.ई. सोसायटीच्या एम. जे. कॉलेज परिसरात हा 21 दिवसांचा निवासी प्रशिक्षण वर्ग संपन्न होणार आहे. महाराष्ट्र, गोवा आणि गुजरात या तीन राज्यांतील सुमारे 300 स्वयंसेवक या वर्गात सहभागी होत असून त्यांना शारीरिक, बौद्धिक, संघटनात्मक तसेच सेवाभावी कार्याचे सखोल प्रशिक्षण दिले जाणार आहे.
या प्रशिक्षण वर्गात स्वयंसेवकांच्या सर्वांगीण विकासावर विशेष भर देण्यात येणार आहे. दररोज पहाटे 4.30 वाजता दिनचर्या सुरू होऊन रात्री 10 वाजेपर्यंत विविध शिस्तबद्ध सत्रांचे आयोजन केले जाईल. शारीरिक प्रशिक्षण, बौद्धिक वर्ग, संघटन कौशल्य, व्यवस्थापन आणि सेवा कार्य यांचा समावेश या कार्यक्रमात असून स्वयंसेवकांना घोष वादनाचेही प्रशिक्षण दिले जाणार आहे. या वर्गाचा एक भाग म्हणून एक दिवस सघोष संचलन काढण्यात येणार असून शिस्त, एकता आणि संघटन शक्तीचे दर्शन घडविले जाणार आहे.

हा वर्ग केवळ प्रशिक्षण नसून एक कठोर अनुशासनात्मक साधना मानली जात आहे. विशेष म्हणजे संपूर्ण वर्ग व्यवस्था पर्यावरणपूरक ठेवण्यात आली असून प्लास्टिकचा वापर पूर्णपणे टाळण्यात आला आहे. निसर्ग संवर्धनाचा संदेश देत स्वच्छ आणि शाश्वत जीवनशैलीचा आदर्श या माध्यमातून समाजापुढे ठेवला जाणार आहे.
या प्रशिक्षण वर्गासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे, सह सरकार्यवाह अरुण कुमार आणि मंगेश भेंडे यांसारखे वरिष्ठ पदाधिकारी शिक्षार्थींना मार्गदर्शन करणार आहेत. याशिवाय विविध क्षेत्रांतील अनुभवी अधिकारीही या वर्गात सहभागी होणार असून वर्गाधिकारी म्हणून सुधीर चापोरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
या उपक्रमात समाजातील सर्व स्तरातील सज्जन शक्तीचा सक्रिय सहभाग दिसून येत आहे. जळगाव शहरातील अनेक संस्था आणि संघटना या वर्गाच्या व्यवस्थापनात प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष स्वरूपात योगदान देत आहेत. विशेषतः भोजन व्यवस्थेसाठी दररोज हजारो पोळ्या शहरातील विविध कुटुंबांकडून संकलित केल्या जाणार असून मातृशक्तीचा या उपक्रमात मोठा सहभाग राहणार आहे. समाजाला राष्ट्रकार्याशी जोडण्याचा हा एक अभिनव प्रयत्न असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे.
या 21 दिवसांच्या प्रशिक्षणाचा समारोप 30 मे रोजी सायंकाळी होणार असून या वेळी स्वयंसेवक आपल्या प्रशिक्षणाचे प्रात्यक्षिक सादर करणार आहेत. समारोप कार्यक्रमाला शहरातील नागरिक, माता-भगिनी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संघाच्या वतीने करण्यात आले आहे.



