Home क्राईम कर्तव्यात निष्काळजीपणा; पोलीस अंमलदार तात्काळ निलंबित !

कर्तव्यात निष्काळजीपणा; पोलीस अंमलदार तात्काळ निलंबित !


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । पोलीस मुख्यालय जळगाव अंतर्गत कार्यरत असलेल्या दोन पोलीस अंमलदारांना कर्तव्यात गंभीर निष्काळजीपणा आणि शिस्तभंग केल्याप्रकरणी तातडीने निलंबित करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षकांनी याबाबतचे आदेश निर्गमित केले असून, या घटनेमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक ८ मे २०२६ रोजी रात्री सुमारे ९.२० वाजता राखीव पोलीस निरीक्षक, पोलीस मुख्यालय जळगाव यांनी पोलीस अधीक्षक बंगल्यावरील गार्ड ड्युटीचे अचानक निरीक्षण केले. यावेळी गार्ड ड्युटीवर नियुक्त असलेले सफौ/१३७८ संभाजी निबाजी पाटील आणि पोना/३९३ प्रदीप भगतसिंग राजपूत हे दोघेही आपल्या कर्तव्याच्या ठिकाणी अनुपस्थित असल्याचे निदर्शनास आले.

तपासणीदरम्यान आणखी धक्कादायक बाब समोर आली. गार्ड रूममध्ये ठेवण्यात आलेल्या तीन एसएलआर रायफल्सपैकी बट नं. ८२.२६२.८८२ असलेली रायफल दारूगोळ्याविना आणि कोणतीही सुरक्षा व्यवस्था न ठेवता बेवारस अवस्थेत आढळून आली. संवेदनशील ठिकाणी अशा प्रकारची निष्काळजीपणा गंभीर मानला जात असून, शस्त्रास्त्रांच्या सुरक्षिततेबाबत मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे.

पोलीस प्रशासनाच्या माहितीनुसार, संबंधित दोन्ही अंमलदारांचे वर्तन महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम १९७९ मधील नियम ३ चे उल्लंघन करणारे असून, कर्तव्यच्युती आणि शिस्तभंगाच्या गंभीर प्रकारात मोडणारे आहे. त्यामुळे पोलीस अधीक्षकांनी तातडीने कारवाई करत दोघांनाही शासकीय सेवेतून निलंबित केले आहे.

निलंबन कालावधीत दोन्ही अंमलदारांचे मुख्यालय पोलीस मुख्यालय, जळगाव येथेच राहणार असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पूर्वपरवानगीशिवाय त्यांना मुख्यालय सोडण्यास मनाई करण्यात आली आहे. या घटनेची पोलीस विभागात जोरदार चर्चा सुरू असून, सुरक्षा व्यवस्थेतील निष्काळजीपणाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.


Protected Content

Play sound