Home क्राईम पीडब्ल्यूडीला लाचेचा विळखा : पाच लाखांची लाच स्वीकारतांना शाखा अभियंत्याला अटक

पीडब्ल्यूडीला लाचेचा विळखा : पाच लाखांची लाच स्वीकारतांना शाखा अभियंत्याला अटक


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । नेहमीच वादाच्या भोवऱ्यात राहणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाला (PWD) पुन्हा एकदा भ्रष्टाचाराच्या आरोपांनी हादरा बसला आहे. जळगाव जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभागातील शाखा अभियंता योगेश अहिरे यांना १५ लाख रुपयांच्या लाचेची मागणी करून त्यातील ५ लाख रुपये स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहाथ अटक केली. या कारवाईमुळे संपूर्ण विभागात मोठी खळबळ उडाली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव जिल्ह्यातील एका मक्तेदाराचे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे मोठे बिल प्रलंबित होते. संबंधित बिलाची रक्कम मंजूर करून देण्यासाठी शाखा अभियंता योगेश अहिरे यांनी तब्बल १५ लाख रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचा आरोप आहे. या मागणीमुळे त्रस्त झालेल्या तक्रारदाराने लाच देण्यास नकार देत थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली.

तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीच्या पथकाने सापळा रचला. शनिवारी दुपारच्या सुमारास सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालय परिसरात तडजोडीनंतर ५ लाख रुपयांची रक्कम स्वीकारताना योगेश अहिरे यांना अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले. त्यानंतर त्यांना तात्काळ ताब्यात घेण्यात आले.

या कारवाईनंतर सार्वजनिक बांधकाम विभागातील भ्रष्टाचार पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे. यापूर्वीही विभागातील विविध कामांमध्ये गैरव्यवहार आणि आर्थिक अनियमिततेचे आरोप होत आले आहेत. त्यामुळे या घटनेने विभागाच्या प्रतिमेला आणखी धक्का बसला आहे.

दरम्यान, या प्रकरणात केवळ शाखा अभियंताच नव्हे तर काही वरिष्ठ अधिकाऱ्यांचाही सहभाग असू शकतो, अशी चर्चा विभागात सुरू झाली आहे. त्यामुळे एसीबीने या प्रकरणाची सखोल चौकशी करून संपूर्ण साखळी उघड करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या या धडक कारवाईमुळे सरकारी कार्यालयांमधील भ्रष्टाचाराविरोधात कठोर संदेश गेला असून, पुढील चौकशीत आणखी धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


Protected Content

Play sound