नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा । चॅटजीपीटी सामान्य लोकांसाठी उपलब्ध होऊन आता तीन वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. या काळात कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआय क्षेत्रात प्रचंड वेगाने बदल झाले असून, चॅटजीपीटी आणि जेमिनीसारखे एआय एलएलएम आता केवळ प्रश्नांची उत्तरे देणारी साधने राहिलेली नाहीत. ही प्रणाली आता ‘एआय एजंट’च्या रूपात विकसित होत असून, जटिल कामे स्वयंचलितपणे पार पाडण्यास सक्षम होत आहेत. अशातच आता ओपनएआय ‘एआय एजंट फोन’ विकसित करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा तंत्रज्ञान विश्वात रंगू लागली आहे.
एआय हार्डवेअर क्षेत्रात पुढचा मोठा टप्पा म्हणून या स्मार्टफोनकडे पाहिले जात आहे. हा फोन पारंपरिक अँड्रॉइड किंवा आयओएस स्मार्टफोनपेक्षा पूर्णपणे वेगळा अनुभव देऊ शकतो. तज्ज्ञांच्या मते, भविष्यात स्मार्टफोन वापरण्याची पद्धतच बदलण्याची क्षमता या डिव्हाइसमध्ये असू शकते.

तंत्रज्ञान विश्लेषकांच्या माहितीनुसार, या एआय फोनमध्ये पारंपरिक ॲप-आधारित इंटरफेसऐवजी ‘टास्क-आधारित’ प्रणाली असण्याची शक्यता आहे. वापरकर्त्याला वेगवेगळे ॲप्स उघडण्याऐवजी फोनला थेट काम सांगता येईल. उदाहरणार्थ, सकाळी उठल्यानंतर फोन स्वतःच ईमेल तपासणे, उत्तर देणे, आवश्यक कॉल करणे, मीटिंग शेड्यूल करणे किंवा किराणा माल ऑर्डर करणे यांसारखी कामे करू शकतो.
या संभाव्य फोनमध्ये मीडियाटेक डायमेंसिटी 9600 प्रोसेसर आणि दोन एआय प्रोसेसिंग युनिट्स (NPU) असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कॅमेरा फक्त फोटो काढण्यासाठी न वापरता आजूबाजूचा परिसर स्कॅन करून वापरकर्त्याला संदर्भानुसार माहिती देण्यासाठी वापरला जाऊ शकतो. प्रसिद्ध विश्लेषक मिंग-ची कुओ यांच्या अंदाजानुसार, हा फोन 2027 पर्यंत बाजारात येऊ शकतो आणि पहिल्याच वर्षात तब्बल 3 कोटी युनिट्सची विक्री होण्याची शक्यता आहे.
ओपनएआय व्यतिरिक्त इतर तंत्रज्ञान कंपन्याही एआय-आधारित उपकरणांच्या विकासात मोठी गुंतवणूक करत आहेत. मेटास्टॅट रिसर्चच्या अहवालानुसार, एआय गॅजेट्सचा जागतिक बाजार 2032 पर्यंत दरवर्षी सुमारे 24 टक्क्यांनी वाढू शकतो.
ओपनएआयकडून विकसित होणाऱ्या ‘स्मार्ट पिन’चीही चर्चा सुरू आहे. हे एक स्क्रीनलेस वेअरेबल डिव्हाइस असू शकते, ज्यामध्ये मायक्रोफोन, कॅमेरा आणि स्पीकर असेल. हे डिव्हाइस आजूबाजूचा डेटा गोळा करून चॅटजीपीटीशी संवाद साधेल. सुरुवातीला 2026 पर्यंत लॉन्च होण्याची शक्यता वर्तवली जात होती, मात्र आता त्याची वेळ बदलू शकते.
दरम्यान, ॲपलही एआय क्षेत्रात आक्रमकपणे पुढे येत आहे. कंपनी एका एआय पिनवर काम करत असल्याची माहिती समोर आली आहे. एअरटॅगइतक्या छोट्या आकाराच्या या डिव्हाइसमध्ये दोन कॅमेरे, तीन मायक्रोफोन आणि स्पीकर असू शकतात. हे डिव्हाइस रिअल-टाइम भाषांतर, मीटिंग नोट्स आणि व्हॉइस-आधारित सहाय्यक सेवा देऊ शकते. 2027 अखेरपर्यंत हे उपकरण बाजारात येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
गुगलही जेमिनी एआयवर आधारित स्मार्ट ग्लास विकसित करत आहे. या ग्लासमध्ये पारदर्शक लेन्सवर माहिती दिसेल, मात्र वापरकर्त्याची दृष्टी अडवली जाणार नाही. दिशानिर्देश, नोटिफिकेशन्स आणि प्रश्नांची उत्तरे थेट लेन्सवर दिसतील, असा दावा केला जात आहे.
याशिवाय ॲपल एका टेबलटॉप रोबोटवरही काम करत असल्याचे समोर आले आहे. टॅबलेटसारखी स्क्रीन असलेल्या या रोबोटमध्ये एआय-आधारित सिरी अधिक प्रगत स्वरूपात कार्य करेल. व्हॉइस कमांडद्वारे विविध कामे नियंत्रित करता येतील.
एआय क्षेत्रातील ही नवी स्पर्धा केवळ सॉफ्टवेअरपुरती मर्यादित राहिलेली नाही, तर आता हार्डवेअर क्षेत्रातही मोठी क्रांती घडवण्याच्या दिशेने तंत्रज्ञान कंपन्या पुढे सरकत आहेत. आगामी काही वर्षांत स्मार्टफोन, वेअरेबल्स आणि स्मार्ट उपकरणांचा वापर करण्याची पद्धत पूर्णपणे बदलू शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे.



