
जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील फुले मार्केट, दाणा बाजार आणि कोंबडी बाजार परिसरात आज सकाळी 8 वाजेपासून अतिक्रमण निर्मूलन पथकाने मोठी कारवाई करत अनधिकृतपणे ठेवलेले साहित्य जप्त केले. या कारवाईमुळे परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.

महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने शहरातील मुख्य बाजारपेठांमध्ये वाढत्या अतिक्रमणाविरोधात धडक मोहीम राबवत फुले मार्केट परिसरात विशेष तपासणी सुरू केली. या वेळी काही व्यापारी व कार्यालयीन वापरासाठी मीटर रूममध्ये अनधिकृतपणे ठेवलेले टेबल, बाकडे तसेच इतर साहित्य आढळून आले. हे सर्व साहित्य तात्काळ जप्त करण्यात आले.
दाना बाजार आणि कोंबडी बाजार परिसरातही अतिक्रमण हटविण्याची कारवाई करण्यात आली. रस्त्यावर आणि सार्वजनिक जागांवर अनधिकृतपणे ठेवलेल्या हातगाड्या तसेच इतर वस्तू हटविण्यात आल्या. या कारवाईदरम्यान तीन हातगाड्या जप्त करण्यात आल्या असून, संबंधितांवर पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत.
ही संपूर्ण मोहीम अतिक्रमण निर्मूलन अधीक्षक संजय ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली. सकाळी सुरू झालेली ही कारवाई दुपारी 12 वाजेपर्यंत सुरू होती. शहरातील बाजारपेठांमध्ये शिस्त राखण्यासाठी आणि वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ नये यासाठी ही कारवाई आवश्यक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
महानगरपालिकेच्या या कारवाईमुळे बाजार परिसरात काही काळ व्यापाऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती. मात्र, प्रशासनाकडून पुढेही अतिक्रमणाविरोधात कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांनी तसेच व्यापाऱ्यांनी सार्वजनिक जागांवर अतिक्रमण टाळावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.



