मुंबई-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा । लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या कन्या तसेच कम्युनिस्ट चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्त्या कॉम्रेड शांताबाई साठे (दोडके) यांचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले. कांदिवली येथील खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्या ९० वर्षांच्या होत्या. त्यांच्या निधनामुळे अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा आणि संघर्षशील परंपरेचा वारसा जपणारा महत्त्वाचा दुवा तुटल्याची भावना सामाजिक, सांस्कृतिक आणि कामगार चळवळीतील कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.
शांताबाई या अण्णाभाऊ साठे यांच्या पत्नी कॉम्रेड जयवंताबाई यांच्या कन्या होत्या. बालपणापासूनच त्यांच्यावर डाव्या विचारसरणीचे संस्कार झाले होते. बाल संघ आणि तत्कालीन लाल बावटा कला पथकातून त्यांनी सामाजिक जनजागृतीचे काम सुरू केले. सांस्कृतिक चळवळीच्या माध्यमातून समाजप्रबोधन करत त्यांनी आयुष्यभर कष्टकरी आणि कामगार वर्गाशी नाळ जोडून ठेवली.

१९४९ मध्ये कम्युनिस्ट पक्षावर मोठ्या प्रमाणावर दडपशाही सुरू असताना शांताबाईंनाही तुरुंगवास भोगावा लागला होता. काही महिने त्यांनी कारावास सहन केला. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने अवघ्या सोळाव्या वर्षी त्यांनी औषध निर्मिती कंपनीत नोकरी स्वीकारली. नोकरी सांभाळत असतानाच त्या कामगार संघटनांच्या चळवळीत सक्रिय राहिल्या. आयुष्यभर त्यांनी सामाजिक बांधिलकी जपत कामगार हक्कांसाठी संघर्ष केला.
शांताबाईंच्या स्वभावात माणुसकी आणि कुटुंबाविषयीचा जिव्हाळा विशेष होता. स्वतःच्या मर्यादित पगारातून त्या दर महिन्याला वाटेगाव येथे अण्णाभाऊ साठे यांच्या पहिल्या पत्नी कोंडाबाईंना आर्थिक मदत पाठवत असत. अण्णाभाऊंच्या पहिल्या कुटुंबाशी, विशेषतः मुलगा मधुकर यांच्याशी त्यांचे आत्मीय संबंध होते. आर्थिक अडचणी असूनही त्यांनी कधीही सामाजिक जबाबदाऱ्यांपासून स्वतःला दूर ठेवले नाही.
साहित्य, लोकनाट्य आणि रंगभूमीशी त्यांचे अतूट नाते होते. अण्णाभाऊ साठे यांच्या कथा, कादंबऱ्या आणि लोकनाट्यांच्या त्या पहिल्या वाचक मानल्या जात होत्या. शाहीर अमर शेख आणि शाहीर दत्ता गव्हाणकर यांच्या कलापथकात त्यांनी सक्रिय भूमिका बजावली. सत्तरच्या दशकात ‘काय चाललंय गं’ या लोकनाट्यात त्यांनी अभिनय केला होता. तसेच १९८६ मध्ये ‘लोकमंच’ संस्थेच्या गाजलेल्या ‘अकलेची गोष्ट’ या लोकनाट्यात त्यांनी अभिनयासोबत दिग्दर्शन सहाय्यक म्हणूनही काम केले होते.
उतारवयात कलाकार पेन्शन मिळवण्यासाठी त्यांना मोठा संघर्ष करावा लागला. मात्र कोणत्याही परिस्थितीत त्यांनी आपल्या तत्त्वांशी तडजोड केली नाही. शासनाची खुशामत न करता स्वाभिमानाने आयुष्य जगणे त्यांनी पसंत केले. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या कन्या असूनही समाजाकडून अपेक्षित सन्मान मिळाला नसल्याची खंत त्यांना कायम होती. तरीदेखील कष्टकरी, कामगार आणि सामाजिक चळवळीशी असलेली आपली बांधिलकी त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत जपली.
त्यांच्या निधनाने संघर्ष, स्वाभिमान आणि सामाजिक बांधिलकी जपणारे एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना विविध स्तरांतून व्यक्त होत आहे.



