जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । मेहनत, सातत्य आणि आत्मविश्वासाच्या जोरावर कोणतेही यश मिळवता येते, हे जळगाव शहरातील सेंट टेरेसा शाळेची विद्यार्थिनी ज्ञानदा गणेश महालपुरे हिने आपल्या यशातून सिद्ध करून दाखवले आहे. कोणतीही खासगी शिकवणी न लावता केवळ स्वअध्ययनाच्या जोरावर ज्ञानदाने दहावीच्या परीक्षेत ५०० पैकी ४८६ गुण मिळवले असून अतिरिक्त १४ गुणांसह तिने एकूण १०० टक्के गुण प्राप्त करत उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
ज्ञानदाच्या या यशामुळे शैक्षणिक क्षेत्रात तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. साधारण कुटुंबातून येणाऱ्या ज्ञानदाने लहानपणापासूनच अभ्यासात सातत्य ठेवत प्रत्येक वर्गात प्रथम क्रमांक पटकावला होता. तिच्या मेहनतीची आणि अभ्यासातील चिकाटीची झलक शालेय जीवनातच दिसून आली होती. दहावीच्या महत्त्वाच्या वर्षातही तिने नियमित अभ्यास, वेळेचे नियोजन आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर हे घवघवीत यश मिळवले.

ज्ञानदाचे वडील गणेश महालपुरे हे एका फार्मा कंपनीत कार्यरत आहेत. मर्यादित साधनसंपत्ती असतानाही त्यांनी मुलीला शिक्षणासाठी नेहमी प्रोत्साहन दिले. ज्ञानदाने अभ्यासासाठी स्वतःचे स्वतंत्र वेळापत्रक तयार केले होते. ती दररोज नियोजनबद्ध पद्धतीने अभ्यास करत होती. विशेष म्हणजे मोबाईल, सोशल मीडिया आणि इतर आकर्षणांपासून दूर राहत तिने पूर्ण लक्ष अभ्यासावर केंद्रित केले.
खासगी शिकवणीशिवाय मिळवलेले हे यश अनेक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. आजच्या डिजिटल युगात मोबाईल आणि सोशल मीडियामुळे विद्यार्थ्यांचे अभ्यासापासून लक्ष विचलित होत असताना ज्ञानदाने स्वअनुशासन आणि स्वअध्ययनाच्या माध्यमातून यशाचा नवा आदर्श निर्माण केला आहे.
ज्ञानदाच्या यशाबद्दल तिच्या शाळेतील शिक्षक, मित्रपरिवार तसेच नातेवाईकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. भविष्यात उच्च शिक्षण घेऊन मोठे ध्येय गाठण्याची इच्छा तिने व्यक्त केली आहे. तिच्या या यशामुळे जळगाव शहराच्या शैक्षणिक क्षेत्रात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.



