जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शिवसेना-उबाठा पक्षाचे जिल्हा संपर्क प्रमुख संजय सावंत यांची पक्षाच्या उपनेतेपदी निवड करण्यात आली असून आता आगामी निवडणुकीत त्यांच्यावर पुन्हा एकदा पक्षाने विश्वास दाखवल्याचे मानले जात आहे.
शिवसेना आणि आताच्या शिवसेना-उबाठा पक्षात जिल्हा संपर्क प्रमुखपद हे अतिशय महत्वाचे मानले जाते. शिवसेनेत फुट फडण्याच्या कालखंडात जळगाव जिल्ह्यात पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना बऱ्यापैकी एकसंघ राखण्याचे काम संपर्क प्रमुख संजय सावंत यांनी पार पाडले असून त्यांच्या नेतृत्वाखाली आगामी विधानसभा निवडणुक लढली जाणार आहे. या आधीच त्यांना पक्षाच्या वतीने पदोन्नती देण्यात आली आहे.
संजय सावंत यांना आता शिवसेना-उबाठा पक्षाच्या उपनेतेपदाची जबाबदारी सुपुर्द करण्यात आली असून याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आलेली आहे. एका अर्थाने पक्षाने त्यांच्या कामाची दखल घेतल्याचे मानले जात आहे. तर आता त्यांच्यावरील जबाबदारी देखील वाढणार आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेना-उबाठा पक्षाच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष राहणार आहे. पक्षाने आधीच पाचोऱ्यातुन वैशालीताई सुर्यवंशी यांची उमेदवारी जाहीर केली आहे. या सोबत पक्षाने आता पाचोऱ्यासह चाळीसगाव, एरंडोल, जळगाव शहर आणि जळगाव ग्रामीण, चोपडा या मतदारसंघांवर दावा दाखल केला आहे. यातील काही जागा या शरद पवार गटाला सुटण्याची देखील शक्यता आहे. एकीकडे जागा वाटपाचे चित्र स्पष्ट नसतांना संजय सावंत यांच्यावरील जबाबदारी आता वाढणार आहे.
या संदर्भात लाईव्ह ट्रेंडस न्यूजच्या प्रतिनिधीने संजय सावंत यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आपण लवकरच जिल्ह्यात येऊन पत्रकार परिषदेच्या माध्यमात्ूान भूमिका मांडणार असल्याचे स्पष्ट केले. तर सावंत यांच्या प्रमोशनचा पक्षाला नेमका काय लाभ होणार याचे चित्र विधानसभा निकालातून स्पष्ट होणार हे देखील तितकेच खरे !