अर्नबची सर्वोच्च न्यायालयात धाव

 

मुंबई: वृत्तसंस्था । वास्तुविशारद अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात अटकेत असलेले ‘रिपब्लिक टीव्ही’चे मालक, संपादक यांनी जामिनासाठी आता सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

मुंबई उच्च न्यायालयानं त्यांना अंतरिम जामीन देण्यास नकार दिला आहे. त्यानंतर गोस्वामी यांनी सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याचा निर्णय घेतला आहे.

वास्तुविशारद अन्वय नाईक व त्यांच्या आई कुमुद नाईक यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या गुन्ह्यात अर्णव गोस्वामी यांना रायगड पोलिसांनी मागील आठवड्यात अटक केली होती. सत्र न्यायालयानं त्यांच्या जामिनावर तातडीची सुनावणी करण्यास नकार दिल्यानं त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. तिथं सलग तीन दिवस त्यांच्या जामिनावर सुनावणी झाली.

अर्णव यांची अटक बेकायदा आहे. त्यामुळं त्यांना तातडीनं अंतरिम जामीन दिला जावा, असा युक्तिवाद अर्णव यांच्या वतीनं करण्यात आला होता. मात्र, तातडीची सुटका मिळण्यासाठी न्यायालयानं आपल्या विशेष अधिकारांचा वापर करावा, असे आरोपींनी काहीही दाखवलेले नाही. त्यांना फौजदारी दंड संहितेच्या कलम ४३९ अन्वये जामीन मिळवण्यासाठी नियमित जामीन अर्ज करण्याचा मार्ग मोकळा आहे, असं सांगत, त्यांना सत्र न्यायालयात अर्ज करण्यास सांगितले. तसंच, सत्र न्यायालयानं कायद्याप्रमाणे चार दिवसांत योग्य तो निर्णय द्यावा, असंही मुंबई उच्च न्यायालयानं स्पष्ट केलं होतं. त्यामुळं अर्णव यांचा न्यायालयीन कोठडीतील मुक्काम लांबला होता. .

Protected Content