पर्यावरण संवर्धन व अवयवदानाबाबत जनजागृती हवी

चोपडा प्रतिपिधी। भविष्यात पाण्याचा जपुन वापर, जलपुनर्भरण, वृक्ष लागवड यासारख्या उपाययोजना अनिवार्य असून त्याकडे गांभिर्याने बघितले पाहिजे तसेच अवयवदान व देहदानासारख्या संकल्पना समाजाने स्विकारल्या पाहिजेत व अनेक जीव वाचवले पाहिजेत असा मोलाचा संदेश चोपडा येथील भगिनी मंडळाच्या सांस्कृतिक सभागृहात आयोजित जनजागृतीपर कार्यशाळेत मान्यवरांनी दिला.

याप्रसंगी मंचावर जीवन ज्योती नर्सिंग होमच्या डॉ श्रीमती सुमनबाला गुजराथी, चोपडा शहराचे स्वच्छतादूत डॉ विकास हरताळकर, आयएमएचे अध्यक्ष डॉ नरेंद्र शिरसाठ, सचिव डॉ जगदीश सर्वैय्या, डॉ रविंद्र गुजराथी, डॉ लोकेंद्र महाजन, चोपडा शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष मोरेश्‍वर देसाई, रोटरी क्लबचे सचिव आशिष अग्रवाल हे मंचावर उपस्थित होते. चोपडा येथील जीवन ज्योती नर्सिंग होमच्यावतीने स्व. डॉ. वल्लभदास गुजराथी यांच्या जयंतीनिमीत्त आयोजित या कार्यक्रमात येथील बालरोगतज्ञ डॉ. रवींद्र गुजराथी यांनी अवयवदान व देहदान याविषयी स्लाईड शोद्वारे मार्गदर्शन केले. अवयवदान व देहदानाची आवश्यकता, कार्यपद्धती याविषयी माहिती दिली. तर अस्थिरोगतज्ञ डॉ नरेंद्र शिरसाठ यांनी जलव्यवस्थापन या संदर्भांत स्लाईड शोच्या माध्यमातून मार्गदर्शन करतांना पाण्याचे स्त्रोत, त्यांची काळजी, काळजीपूर्वक वापर, पाणी टंचाईवर उपाययोजना सांगतांना लोकसहभागाची गरज अधोरेखीत केली.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संजय बारी यांनी तर प्रास्ताविक डॉ. नरेंद्र शिरसाठ व आभार प्रदर्शन आशिष गुजराथी यांनी केले. कार्यक्रमास विठ्ठलदास गुजराथी, वसंतलाल गुजराथी, माजी नगराध्यक्ष रमणलाल गुजराथी, नगरनगरसेविका सरला शिरसाठ, सीमा श्रावगी, सुरेखा माळी, अश्‍विनी गुजराथी यांच्यासह शहरातील अनेक प्रतिष्ठित नागरिक, शिक्षक, प्राध्यापक, रोटरी सदस्य उपस्थीत होते.

Add Comment

Protected Content