बळीराजाला हमी भाव देण्यासाठी महाविकास आघाडीची स्थापना – शरद पवार

sharad pawar new 696x447

जळगाव/चाेपडा प्रतिनिधी । मुख्यमंत्री पदाच्या जागेवर जो उमेदवार बसतो त्यांच्या निर्णय घेण्याची क्षमता जास्त असते, राज्यातील बळीराजाला योग्य भाव व केलेल्या कष्टाचे मोल व्हावे यासाठी महाविकास आघाडीची स्थापना केली गेली असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.

चोपडा येथे चोपडा सुतगिरणी प्रकल्पाचे उद्घाटन आज सकाळी शरद पवार यांच्याहस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी खा.शरद पवार म्हणाले की, आर्थिक अडचणींमुळे व ऊसाच्या कमतरतेमुळे चोपडा शेतकरी साखर कारखाना बंद पडला आहे.त्याला सुरू करण्यासाठी कारखाना भाडेतत्वावर देण्याची मागणी सगळ्यांनी माझ्याकडे केली.परंतु भाडे तत्व हे मला न पटणारे आहे.त्यापेक्षा कारखाना सुरू करण्याच्या दृष्टीने सगळ्यांनी एकत्र बसून यथायोग्य निर्णय घेण्याचे आवाहन केले.कारखाना भाडेतत्वावर देणे म्हणजे शेतकरी व सभासदांना आपल्या हितावह नसल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यातील रस्त्यांच्या परिस्थितीवर टीका करतांना शरद पवार म्हणाले की, जळगाव-अौरंगाबाद रस्ता इतका खराब झालाय की,त्यावरून यायचे म्हणजे एकतर डॅाक्टर सोबत पाहिजे किंवा अंग चेपणारा सोबत हवा.रस्त्यांचीही दुरावस्था थांबविण्याचे त्यांनी सांगितले.

हेलीपॅडवर स्वागत
दरम्यान माजी कृषी मंत्री शरद पवार, ना.दिलीप वळसे पाटील यांचे कला, शास्त्र आणि वाणिज्य महाविद्यालयाचे प्रांगणातील हेलीपॅडवर माजी विधानसभाध्यक्ष अरुणभाई गुजराथी, सूतगिरणी चेअरमन माजी आ.कैलास पाटील, कॅाग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड.संदीप पाटील, भाजप नेते घनःश्याम अग्रवाल, अमळनेरचे आ.अनिल पाटील आदिंनी स्वागत केले. यावेळी महात्मा गांधी शिक्षण मंडळाच्या सभागृहात अॅड.संदीप पाटील यांनी नेत्यांचे स्वागत केले.

याप्रसंगी प्रास्तविक करतांना चेअरमन माजी आ.पाटील म्हणाले की,जिल्ह्यातील पाचही साखर कारखान्यांची वाईट परिस्थिती आहे.त्यात आपणास लक्ष घालावे लागेल.९१ कोटींचा सूतगिरणी प्रकल्प सुरु व्हायला २७ वर्षे लागली.शेतकऱ्यांच्या प्रकल्प पूर्ण करण्यासाठी मी धुरा हाती घेतली. परंतु २५ हजार चात्यांची क्षमता पूर्ण होईपर्यंत उद्घाटन न करण्याचा आमचा मानस होता. त्यानुसार आज संपूर्ण क्षमतेने सूतगिरणी सुरु झाल्यामुळे पवार साहेबांसारख्या दूरदर्शी नेत्याच्या हस्ते उद्घाटन होत असल्याचा आनंद होत आहे.भविष्यात कापूसावर प्रक्रिया करीत एकाच परिसरात कापड निर्माण करण्याचा मानस आहे. कार्यक्रमात सूतगिरणीचे पहिले मुख्य प्रवर्तक माजी आ.डॅा.सुरेश पाटील यांचा सत्कार खा.शरद पवार यांच्याहस्ते करण्यात आला.तसेच राष्ट्रपतींचे हस्ते नाईंटीगेल पुरस्कार प्राप्त केलेल्या आशाबाई गजरे यांचा सत्कारही यावेळी करण्यात आला.

यावेळी विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी म्हणाले की, साखर कारखाना बंद असल्याने मनाला दुःख आहे.तर सूतगिरणी सुरू झाल्याचा आनंद आहे.चोसाका पवारांच्याहस्ते सुरु झाला होता.त्याचे १५ कोटींचे देणे पवार साहेबांनी परस्पर दिले.शरद पवारांनी तालुक्याच्या विकासाला नेहमी हातभार लावून उपकार केले आहेत.त्यांचा प्रत्येक विषयाचा अभ्यास असून त्या माध्यमातून महाराष्ट्राचा विकास केला.

मंदीवर मात करण्यासाठी सरकार प्रयत्नशिल – दिलीप वळसे-पाटील
राज्याचे कामगार मंत्री ना. दिलीप वळसे पाटील म्हणाले की, सद्यस्थितीत शेतकरी अडचणीत आहेत. उद्योग व देश मंदीत सापडला आहे. या मंदीच्या परिस्थितीवर मात करण्यासाठी राज्याचे सरकार प्रयत्न करते आहे. सूतगिरणी सर्वपक्षीय व अधिक चांगल्या पध्दतीने पुढे नेण्याचा प्रयत्न करा. आम्ही आमच्या स्तरावर मदत करु, अशी ग्वाही त्यांनी बोलतांना दिली.यावेळी मंचावर शेतकरी संघटनेतर्फे शांताराम पाटील, इंदिराताई पाटील, जानकिराम पाटील, निवेदन सादर केले.

मान्यवरांची होती उपस्थिती
यावेळी मंचावर माजी मंत्री डॅा.सतीष पाटील, माजी आ.दिलीप सोनवणे, अमळनेरचे आ.अनिल पाटील,कॅाग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड.संदीप पाटील, चोसाकाचे माजी चेअरमन अॅड.घनःश्याम पाटील, भाजपचे जेष्ठ नेते घनःश्याम अग्रवाल, शांताराम पाटील, माजी जि.प.उपाध्यक्ष जानकीराम पाटील, जिल्हा बॅकेच्या माजी व्हा.चेअरमन इंदिराताई पाटील, पीपल्स बॅंकेचे चेअरमन चंद्रहास गुजराथी, उद्योजक आशिष गुजराथी, प्रभाबेन गुजराथी, पं.स.सभापती कल्पना पाटील, नगराध्यक्षा मनीषा चौधरी,राष्ट्रवादीच्या प्रदेश उपाध्यक्ष विजया पाटील,नगर परिषदेचे गटनेते जीवन चौधरी,राष्ट्रवादीचे पदाधिकारी विकास पवार आदी अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन राधेश्याम पाटील यांनी केले.तर आभार सुतगिरणी संचालक के.डी.चौधरी यांनी मानले.

Protected Content