कर्तबगार खान्देशकन्या तथा देशाच्या इतिहासातील आजवरच्या एकमेव महिला राष्ट्रपती सौ. प्रतिभाताई पाटील यांचा आज वाढदिवस. यानिमित्त त्यांच्या कारकिर्दीचे डोळस साक्षीदार असणारे ज्येष्ठ पत्रकार तथा लाईव्ह ट्रेंडस न्यूजचे सल्लागार संपादक सुरेश उज्जैनवाल यांचा हा विशेष लेख.
भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती, सुखोई विमानामध्ये उड्डाण भरणारी विश्वाची पहिली महिला. महाराष्ट्राचा मानबिंदू सौ. प्रतिभाताई देवीसिंग पाटील या आपल्या आयुष्याची ८५ वर्षें पूर्ण करून आज ८६ वर्षात पदार्पण करीत आहेत. या निमित्त त्यांचे अभिष्टचिंतन अन वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा….!
आपल्या प्रदीर्घ राजकीय वाटचालीत आमदार, मंत्री, विरोधी पक्ष नेता, राज्यसभेच्या उपाध्यक्षा, राज्यपाल आणि जगाच्या सर्वात मोठ्या लोकशाहीच्या राष्ट्रपती, असा त्यांचा राजकीय प्रवास थक्क करणारा आहे. विविध पदांची जबाबदारी सांभाळताना प्रतिभाताईनी आपल्या कर्तृत्वांचा अमीट ठसा भारतीय राजकारणावर उमटविला आहे.
संवेदनशील , शालीन स्वभावाच्या धनी असलेल्या ताईंच्या सम्पूर्ण राजकीय वाटचालीत अहंकार किंवा बडेजाव कधीही आढळून आलेला नाही. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात विविध खाती सांभाळताना प्रत्येक खात्याला लोकसेवेची नवी दिशा आपल्या कार्यकाळात त्यांनी दिली. विशेषतः महिला व मागासवर्गीयांच्या कल्याणासाठी त्यांनी केलेली कामगिरी माईलस्टोन ठरल्याचे म्हटल्यास अतिशयोक्तीचे होणार नाही.
महाराष्ट्रच्या राजकारणात सक्रिय असतानाच्या काळात त्यांनी आपल्या उच्च नेतृत्व गुणांची चुणूक दाखविल्याची अनेक उदाहरणे देता येतील. विशेषतः ऐशीच्या दशकात मंडल आयोगावरील चर्चेचा प्रस्ताव मांडताना राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू यांचा वारसा घेऊन महाराष्ट्र कशी वाटचाल करीत आहे, हे सांगत असताना पुरोगामी विचारच कसा राज्याला तारक आहे , हे पटवून दिले. मंडल आयोगावरील चर्चेत त्यानी राज्यातील अठरापगड जाती – जमातीच्या सर्वांगीण विकासासह सामाजिक समतेची गरज प्रभावीपणे प्रतिपादित केली. त्या वेळी त्यांच्या विचारांचे सर्वत्र कौतुक केले गेले.
सौ. प्रतिभाताई पाटील या आपल्या राजकीय कारकिर्दीत अपराजीत राहिल्या असल्याची बाब देखील विलक्षण अशीच आहे. अर्थात, राजकीय कारकिर्दीत त्या कोणतीही निवडणूक हरल्या नाहीत. जळगावच्या आमदार म्हणून सन १९६२ मध्ये त्या पहिल्यादा निवडून आल्या.त्यानंतर १९६७ ते १९८५ पर्यन्त मुक्ताईनगरच्या आमदार म्हणून प्रतिनिधित्व केले. त्यानंतर १९८५ ते १९९० राज्यसभा सदस्य व राज्यसभेच्या उपाध्यक्षा होत्या. ताईंचे वैशिष्ट्य म्हणजे माहेरी जळगाव जिल्यात तर त्या यशस्वी राहिल्यातच नंतरच्या काळात त्या सासरच्या अमरावती लोकसभा मतदार संघातूनही निवडून गेल्या. म्हणजेच निवडणूक लढविली आणि त्या पराभूत झाल्या असे त्यांच्या बाबतीत कधी घडले नाही, हे विशेष…
सौ. प्रतिभाताई पाटील यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक शिखरांना स्पर्श केला. त्यांनी जनहिताची अनेक कामे केलीत. यातील सर्वात महत्वाचे व येणार्या अनेक पिढ्यांसाठी वरदान ठरणारे काम हे बोदवड सिंचन योजना आहे. सतत दुष्काळी छायेत असलेल्या बोदवड आणि विदर्भतील बुलढाणा जिल्ह्यातील शेतकर्यांसाठी वरदान ठरू शकेल असा बोदवड परिसर सिंचन प्रकल्प ही ताईची मोठी देणगीच म्हणावी लागेल. त्या भागातील १०० गावांपेक्षा जास्त भागाची शेती बहरणार आहे . या सिंचन प्रकल्पाच्या माध्यमातून ४२ हजार हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र सिंचनाखाली येईल. या प्रकल्पाला केंद्रीय जल आयोगाच्या परवानगीसह सुमारे २२हजार कोटींच्या निधीस नियोजन आयोगाची मान्यता आहे. ही योजना परिसराचा कायापालट करणार हे निश्चित.
आज एखादे राजकीय पद आले तरी गर्वोन्नत होणारी नेते मंडळी आपल्या भोवती विपुल प्रमाणात आहे. तथापि, आमदारकीपासून ते थेट देशाच्या राष्ट्रपतीपदापर्यंत विविध पदे भूषवितांना त्यांनी कधी शालीनता, सुसंस्कृतपणा सोडला नाही. आज निवांतपणे आयुष्य व्यतीत करणार्या या कर्तबगार खान्देश कन्येने शतायुषी व्हावे हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
: सुरेश उज्जैनवाल
सल्लागार संपादक
लाईव्ह ट्रेंडस न्यूज
8888889014